१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 21:59 IST2025-11-12T21:58:46+5:302025-11-12T21:59:26+5:30
निकाल बाजूने लावण्यासाठी २५ लाखांची मागणी, न्यायाधिशांसह लिपिकाविरुद्ध गुन्हा

१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माझगांव येथील दिवाणी सत्र न्यायालयातील लिपीकाला १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. अटकेनंतर लिपिकाने अतिरिक्त सत्र न्यायाधीशाना कॉल करून माहिती देताच त्यांनी रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवली. त्यानुसार, एसीबीने लिपिकासह न्यायाधीशांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. थेट न्याय देणारे न्यायाधीशच जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. लिपीक चंद्रकांत हनमंत वासुदेव (४०) याला अटक करण्यात आली असून त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या पत्नीच्या कंपनीच्या मालकीची जागा बळजबरीने कब्जात घेतल्याचा वाद २०१५ पासून न्यायालयीन प्रक्रियेत आहे. या संदर्भातील याचिका उच्च न्यायालयात दाखल असून, २०२४ मध्ये ती केस दिवाणी सत्र न्यायालय, माझगांव येथे वर्ग करण्यात आली होती.
तक्रारदार कार्यालयातील कामानिमित्त ९ सप्टेंबर २०२५ रोजी कोर्टात हजर असताना, लिपीक चंद्रकांत हनमंत वासुदेव (४०) यांनी संपर्क साधला. त्यांनी न्यायाधीशांच्या माध्यमातून त्यांच्या बाजूने निकाल लावण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी १० लाख स्वतःसाठी आणि उर्वरित १५ लाख न्यायाधीशांसाठी देणे अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यानंतर वारंवार कॉल करून पैशांची मागणी सुरु केली. मात्र एवढे पैसे देणे शक्य नसल्याने तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत १० नोव्हेंबर २०२५ रोजी एसीबीकडे धाव घेतली.
पडताळणी दरम्यान वासुदेव यांनी १५ लाख रुपयांची तडजोडीअंती लाच घेण्यास मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, ११ नोव्हेंबर रोजी आयोजित सापळा कारवाईदरम्यान वासुदेव यांनी तक्रारदाराकडून १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर वासुदेव यांनी दिवाणी सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुददीन सलाउददीन काझी (५५) यांना कॉल करून लाचेची रक्कम स्विकारलेबाबत सांगितले. त्यांनीदेखील त्यास संमती दर्शवतात पोलिसांनी वासुदेवसह काझी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात वासुदेवला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. न्यायाधीशांच्या अटके सह त्यांच्या घर झडती साठी परवानगी मागण्यात आली असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे एसीबीने सांगितले.
यापूर्वीची कारवाई
यापूर्वी गेल्यावर्षी एसीबीने साताऱ्यातील जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि तिघांविरुद्ध ५ लाखाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने राज्यात खळबळ उडाली होती. सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी ही मागणी करण्यात आली होती.