Join us

जखमींवर सायनसह भाभा रुग्णालयात उपचार; काही रुग्णांची प्रकृती स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 10:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बेस्ट बस अपघातात जखमी रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. सायन, भाभा रुग्णालयात प्रत्येकी ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बेस्ट बस अपघातात जखमी रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. सायन, भाभा रुग्णालयात प्रत्येकी सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सायन रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी दोन रुग्ण अतिगंभीर असून, एकाचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. काही रुग्णांची प्रकृती स्थिर झाल्यावर शस्त्रक्रिया करु असे सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

बस अपघातात ४९ जण जखमी झाले. घटनास्थळाजवळील भाभा रुग्णालयात ३८ जणांना उपचारासाठी दाखल केले. १६ जणांनी उपचार घेण्यासाठी स्वतःहून डिस्चार्ज घेतला. चौघांना सायन रुग्णालयात, पाच जणांना हबीब रुग्णालय, क्रिटिकेअर आणि सिटी रुग्णालयात प्रत्येकी एक रुग्णाला दाखल केले. 

सायन रुग्णालयात दाखल फजलू रहेमान या रुग्णाला छातीवर गंभीर मार लागला असून, रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून, त्यांना बाहेरून रक्त चढविण्यात आले आहे.

n घटनेनंतर जखमींना भाभा रुग्णालयात आणले जात असताना त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. काही रुग्णांना गंभीर तर काही जणांना किरकोळ खरचटल्याच्या जखमा झाल्या होत्या. काही जणांना मुका मार लागला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काहींनी स्वतःहून डिस्चार्ज घेतला. n तर काहींच्या नातेवाइकांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले. अतुल वर्मा (३५) या रुग्णाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या छातीला आणि पाठीच्या कण्याला मार लागला आहे. त्याला अतिदक्षता विभागात ठेवले आहे.n मेहरबान खान (२०) या रुग्णाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर तातडीची मोठी शस्त्रक्रिया न्यूरोसर्जरी विभागातील डॉक्टरांनी केली आहे. तसेच मोहम्मद इस्लाम मोहम्मद निजाम अन्सारी (४९) या रुग्णाचा दाखल होण्यापूर्वी मृत्यू झाला आहे.

सायन रुग्णालयात दाखल रुग्णसिद्धू कुमार (१६)मस्तान शेख (२९)पंकज सिंग (३५)मोहम्मद इंजमम उल हक (१९)मेहेरबान खान (२०)फजली रेहमान (५२)मोहम्मद साजिद (२३)‘भाभा’मधील रुग्ण मुस्कात फातीमा खान (४)अनिल शहा (३२ )अमन खान (२४)अतुल वर्मा (३५)अख्तर खान (५२)बशीरा शेख (५८ )सुमल सय्यद (५५ )

रुग्णालयात एकूण आठ रुग्ण आले होते. एकाचा दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला, सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काहींना अतितातडीची शस्त्रक्रियांची गरज होती, ती करण्यात आली आहे. दोन गंभीर आहेत, तर पाच रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर संपूर्ण रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.- डॉ.मोहन जोशी, अधिष्ठाता, सायन रुग्णालय

रुग्ण दाखल झाल्यानंतर रुग्णाच्या गरजेप्रमाणे त्यांच्यावर एक्स-रे आणि सिटी स्कॅनच्या चाचण्या केल्या. आमच्याकडे सात जण जखमी आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. अन्य सर्वांची प्रकृती स्थिर आहे.  -डॉ. पद्मश्री अहिरे, वैद्यकीय अधीक्षक, भाभा रुग्णालय - कुर्ला

टॅग्स :कुर्लाबेस्ट