Join us

'...तरीही माझं नाव त्यांना मिटवता येणार नाही'; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 13:47 IST

आता कोणीही हे श्रेय हिरावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

मुंबई- हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूरपर्यंत काम जवळपास पूर्ण झाले आहे. सध्या बुलढाणा आणि वाशिम येथील कान सुरु असून मे अखेर पर्यंत हा महामार्ग नागरिकांसाठी खुला करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा मानस असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हा महामार्ग सुरु होण्यापूर्वी आता शिवसेना- भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. समृद्धी महामार्ग सुरु झाला पाहिजे याचा मला आनंद आहे. पण त्याची कामं अजून पूर्ण झालेली नाहीत ती कामं पूर्ण केल्यानंतरच त्याचं उद्घाटन केलं तर ते अधिक चांगलं होईल. घाई घाईत उद्घाटन आटपून घेतलं तर रस्ता सुरु होईल पण त्या रस्त्याला जे महत्त्व आहे ते महत्त्व कमी होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, समृद्धी महामार्गाबाबत कोणीही कितीही प्रयत्न केले तरी माझे नाव त्यांना मिटवता येणार नाही. हे जनतेचे श्रेय आहे. त्यांनी मला तेव्हा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली म्हणून मी समृद्धी महामार्गाबाबत निर्णय घेऊ शकलो. २० वर्षांपासून ही संकल्पना माझ्या डोक्यात होती. त्यामुळे आता कोणीही हे श्रेय हिरावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार काम-

समृद्धी महामार्ग एकूण आठ पदरी म्हणजे प्रत्येक बाजूला चार लेन आहेत. एवढंच नाही, तर भविष्यात लेन वाढवण्याची गरज पडली तरीही दोन्ही बाजूंच्या मध्ये जागा सोडण्यात आलीय, ज्यामुळे पुन्हा भूसंपादन करण्याचीही गरज पडणार नाही. हा महामार्ग महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींसह दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कोरिडॉर, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कोरिडॉर, वर्धा आणि जालन्याचं ड्राय पोर्ट आणि मुंबईतील जेएनपीटी अशी सर्व प्रमुख केंद्र जोडणार आहे. 

शिर्डी ते मुंबई हे बाकी असलेलं कामही लवकरच पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. पण यापैकी शिर्डी ते नागपूर हा रस्ता किती सुस्साट आणि किती वैभवशाली आहे हे आपण पाहिलं. लवकरच हा रस्ता वाहनधारकांच्या सेवेत येईल आणि महाराष्ट्राच्या दळणवळणाला, रोजगाराला आणि २४ जिल्ह्यांच्या प्रगतीला बळकट करणार आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार