मुंबई : एका ७५ वर्षांच्या आजीच्या घरी घरकाम करणाऱ्याने चोरी केल्याची घटना उघडकीस आली. घरकाम करणाऱ्याने हिऱ्याच्या अंगठीसह ३ लाख रुपयांवर डल्ला मारला. याप्रकरणी जुहू पोलिसांत तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोरी केल्याची बाब समोर आल्यानंतर घरकाम करणारा अविनाश गिरी हा दुसऱ्या दिवशी कामावर आला नाही. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.मेंदूच्या विकाराने त्रस्त असलेल्या आजींचा गैरफायदा घेत घरी काम करणाऱ्यांनी लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मुलाने त्यांना २०१३ रोजी जवळपास एक लाख रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी भेट दिली होती. ती त्यांनी त्यांच्या पतीच्या खोलीमध्ये असलेल्या कपाटात जून २०२३ रोजी ठेवली होती. अविनाश गिरी हा बारा तासांकरिता काम करत होता. २१ जुलै रोजी रात्री फिर्यादीच्या पतीचे औषध आल्याने त्याचे पैसे देण्यासाठी त्यांनी कपाट उघडले. मात्र, कपाटात ठेवलेले जवळपास दोन लाख रुपये आणि अंगठी देखील गायब असल्याचे लक्षात आले. - त्यांनी घरकाम करणाऱ्या संजय शर्मा आणि शिवकुमार कश्यप यांना विचारणा केली. मात्र, त्यांना त्याबाबत काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. - २२ जुलै रोजी गिरी याला याबाबत विचारले तेव्हा त्यानेही नकार दिला. मात्र, संशय तेव्हा बळावला जेव्हा तो दुसऱ्या दिवसापासून कामावर आला नाही.- त्याचवेळी फिर्यादीच्या पतीची तब्येत बिघडली आणि त्यांना २४ जुलै रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आजीच्या मुलाने पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
घरकाम करणाऱ्याने आजीला लुबाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 15:43 IST