सत्याच्या विजयाचा संदेश देणाऱ्या ‘रामलीला’ची धामधूम; कलाकारांची चार महिन्यांपासून जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:01 IST2025-09-29T14:00:18+5:302025-09-29T14:01:24+5:30
मुंबईत रामलीलेची सुरुवात १९५८ साली झाली. श्री महाराष्ट्र रामलीला मंडळाने या परंपरेला प्रारंभ करून आजही ती कायम ठेवली आहे.

सत्याच्या विजयाचा संदेश देणाऱ्या ‘रामलीला’ची धामधूम; कलाकारांची चार महिन्यांपासून जय्यत तयारी
घनश्याम सोनार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महानगरात विविध भाषिक समाज एकत्र नांदतो. सर्व भाषिक नागरिक आपापली सांस्कृतिक, परंपरा जिवंत ठेवतात. मुंबईत मराठीसह तामीळ, कन्नड, मल्याळी, बंगाली, बिहारी यांसह विविध भाषिक समुदायांचा समावेश आहे. मात्र, उत्तर भारतीय समाजासाठी रामलीला हा सोहळा सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक मानला जातो. दरवर्षी नवरात्र ते दसरा या काळात रामायणातील प्रसंग रंगमंचावर सादर करून सत्याचा असत्यावर विजय हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला जातो.
१९५८ झाली सुरुवात
मुंबईत रामलीलेची सुरुवात १९५८ साली झाली. श्री महाराष्ट्र रामलीला मंडळाने या परंपरेला प्रारंभ करून आजही ती कायम ठेवली आहे.
यंदाही बोरीवली रामलीला मैदान आणि कॉटन ग्रीन येथील राम मंदिर आवारात श्री आदर्श रामलीला समिती भव्य सोहळा आयोजित करत आहे. ५ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या रामलीलेसाठी गेल्या चार महिन्यांपासून तयारी सुरू आहे. यासाठी खास मथुरा, उत्तर प्रदेश येथून अनुभवी कलाकार मुंबईत दाखल झाले आहेत. स्थानिक कलाकारांसोबत मिळून ते रंगीत तालीम करतात. समितीचे सदस्य कान बिहारी अग्रवाल म्हणाले, ‘सत्याचा असत्यावर विजय हा रामलीलेचा आत्मा आहे. रावण दहनाच्या वेळी तो संदेश प्रेक्षकांच्या मनात ठसतो.’
रामायणातील प्रसंग ....
बालकांड – रामाचा जन्म, विश्वामित्र ऋषींसोबतचे राक्षसवध, सीतेचे स्वयंवर.
अयोध्याकांड – रामाचे वनवास, दशरथाचा मृत्यू, भरताचा राज्यत्याग.
अरण्यकांड – शूर्पणखा प्रसंग, खर-दूषण वध, माता सीतेचे रावणाकडून अपहरण.
किष्किंधा कांड – सुग्रीव-मित्रता, वाली वध, हनुमानाचा प्रकट पराक्रम.
सुंदरकांड – हनुमानाची लंकेला उडी, सीतेचा शोध, लंकेची जाळपोळ.
युद्धकांड (लंका कांड) – राम-रावण युद्ध, रावण वध, सीतेची पुनर्भेट.
उत्तरकांड – सीतेचा वनवास, लव-कुश जन्म, रामाची जलसमाधी.
रामायणातील सात कांडांचा सारांश आम्ही रंगमंचावर सादर करतो. रामाने सत्यासाठी लढा दिला आणि शेवटी सत्याचा विजय झाला, हेच आम्ही प्रेक्षकांसमोर मांडतो.
सुरेश द्वारकानाथ मिश्रा, प्रमुख,
महाराष्ट्र रामलीला मंडळ, मुंबई
रामलीला ही परंपरा उत्तर भारतीय समाजाची सांस्कृतिक नाळ टिकवून ठेवते. यामुळे महानगराच्या बहुसांस्कृतिक जीवनाला एक नवा आयाम मिळतो.
कान बिहारी अग्रवाल, समन्वयक,
श्री आदर्श रामलीला समिती
यंदा क्रॉस मैदानावर सोहळा
आझाद मैदानावर शिंदेसेनेचा दसरा मेळावे होणार असल्यामुळे यंदा रामलीला साेहळा क्रॉस मैदानावर होणार असल्याचे रामलीला मंडळ समितीने सांगितले.