‘डिजिटल अरेस्ट’चे भूत कायम; मुंबईत ११ महिन्यांत १६४ गुन्हे; निवृत्त वृद्ध सायबर भामट्यांकडून लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:51 IST2025-12-28T13:51:31+5:302025-12-28T13:51:48+5:30
वृद्ध तक्रारदार मुलुंड येथे राहण्यास असून २४ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत डिजिटल अटकेत होते, असे पोलिसांनी सांगितले.

‘डिजिटल अरेस्ट’चे भूत कायम; मुंबईत ११ महिन्यांत १६४ गुन्हे; निवृत्त वृद्ध सायबर भामट्यांकडून लक्ष्य
मुंबई : दिवसेंदिवस डिजिटल अरेस्टचे जाळे वाढत असून शहरातील ८५ वर्षीय सेवानिवृत्त प्राध्यापकाला तीन आठवडे डिजिटल अटकेत ठेवून सायबर भामट्यांनी नऊ कोटी रुपये उकळल्याचा प्रकार सोमवारी समोर आला असताना, पूर्व उपनगरात आणखीन एक डिजिटल अटकेची घटना घडली आहे. सेवानिवृत्त वृद्धास एक महिना डिजिटल अटकेत ठेवून दोन कोटी रुपये उकळणाऱ्या भामट्यांविरोधात सायबर पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या ११ महिन्यांत डिजिटल अरेस्ट संबंधित १६४ गुन्हे नोंद झाले आहेत.
वृद्ध तक्रारदार मुलुंड येथे राहण्यास असून २४ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत डिजिटल अटकेत होते, असे पोलिसांनी सांगितले. सायबर भामट्याने या आजोबांना मुंबई गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून संपर्क केला. तुम्ही दोन कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारात सहभागी असून तुम्हाला आभासी अटक केल्याचेही सांगितले.
६४ गुन्ह्यांची उकल; ८९ आरोपी अटकेत
यावर्षी गेल्या अकरा महिन्यात मुंबईत ४२२२ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. त्यापैकी २८९१ गुन्हे सायबर फसवणुकीचे आहेत. तर डिजिटल अरेस्ट संबंधित १६४ गुन्हे नोंद झाले असून ६४ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या कारवाईत ८९ जणांना अटक केली आहे.
अटकेची भीती दाखवून वयोवृद्धांची फसवणूक -
काही वेळात त्यांना आणखी एका व्यक्तीने सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) अधिकारी असल्याचे भासवून संपर्क साधला. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील नरेश गोयल नावाच्या व्यक्तीच्या घरी सापडलेल्या डायरीत आपले नाव आढळले असून तुमच्या नावे गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. याच भीतीने आजोबांनी दोन कोटी रुपये भामट्याच्या खात्यात ट्रान्सफर केली.
जनजागृती प्रभावहीन?
सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांना वाचवण्यासाठी मोबाईल कॉलर ट्यूनपासून जनजागृतीपर जाहिराती केल्या जात आहेत. बँका ग्राहकांना लघुसंदेश धाडत आहेत.
पोलिस यंत्रणांकडून विविध हेल्पलाईन सुरू आहेत. माध्यमांमधून सर्व प्रकारच्या सायबर गुन्हे, फसवणूक प्रकाराबाबत वृत्त प्रसिद्ध होत आहेत.
तरीही डॉक्टर, वकील, इंजिनिअर, मोठ्या हुद्द्यावरील शासकीय अधिकारी आदी शिक्षित, उच्च शिक्षित नागरिकांना सायबर भामटे लक्ष्य करत आहेत. त्यावरून ही जनजागृती आणि उपाय थिटे, प्रभावहीन ठरत आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो.