नाट्यरंग: अंतर्मनातील ‘महापूर’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 12:54 IST2025-08-24T12:53:44+5:302025-08-24T12:54:00+5:30
Marathi Natak: ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक सतीश आळेकरांचे ५० वर्षांपूर्वीचे ‘महापूर’ नाटक ऋषी मनोहर या तरुण दिग्दर्शकाने पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. प्रेमभंग, शिक्षणातील बेताची गती, आळस आणि गुंतागुंतीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे मानसिक तोल ढळलेल्या तरुणाच्या अवस्थेचे संवेदनशील चित्रण त्यात आहे.

नाट्यरंग: अंतर्मनातील ‘महापूर’
-संजय घावरे
(उपमुख्य उप-संपादक)
ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक सतीश आळेकरांचे ५० वर्षांपूर्वीचे ‘महापूर’ नाटक ऋषी मनोहर या तरुण दिग्दर्शकाने पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. प्रेमभंग, शिक्षणातील बेताची गती, आळस आणि गुंतागुंतीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे मानसिक तोल ढळलेल्या तरुणाच्या अवस्थेचे संवेदनशील चित्रण त्यात आहे. पूर्वी मोहन गोखले यांनी साकारलेली व्यक्तिरेखा नवीन संचात आरोह वेलणकर रंगवीत आहे. या नाटकाची निर्मिती वाइड विंग्ज मीडिया करत आहे, तर कुशाल खोत निर्मिती प्रमुख आहेत.
गोविंदाकडे एक अज्ञात इसम येतो आणि घडलेल्या प्रसंगांची चौकशी करतो. तो गोविंदाला त्याचे आई-वडील कुठे गेले? हा प्रश्न विचारतो. त्या इसमाच्या प्रश्नांना उत्तरे देताना आई-वडील तीर्थयात्रेला गेल्याचे गोविंदा सांगतो, पण त्या इसमाच्या बोलण्यावरून गोविंदाने काहीतरी भयानक हत्याकांड केले असल्याचे प्रथमदर्शनी जाणवते. हळूहळू रहस्यावरचा पडदा सरतो आणि एक थक्क करणारा क्लायमॅक्स पाहायला मिळतो.
५० वर्षांपूर्वीची परिस्थिती आजच्या काळातही साजेशी वाटणे यातच या नाटकाचे यश दडले आहे. प्रसंगागणिक उत्सुकता निर्माण करण्याचे काम संहिता चोख बजावते. कथानकातील गूढ वाढवत उत्कंठा शिगेला नेण्याची जबाबदारी संवाद पार पाडतात. यातील प्रत्येक व्यक्तिरेखेचे वेगळे अस्तित्व आहे. ती व्यक्तिरेखा येतात आणि अलगदपणे रहस्यावरील पडदा बाजूला सारतात. नायिकेचे पोट फाडण्यासारखे काही प्रसंग अंगावर काटा आणतात. संदिग्ध बोलणे, विक्षिप्त वागणे, अचानक लाऊड होऊन क्षणार्धात शांत होणे हे नायकाच्या मनातील विचारांच्या महापुरात रसिकांनाही खेचून नेते.
हे केवळ नाटक नसून वैचारिक अनुभूती घेण्याची प्रक्रिया आहे. प्रायोगिक नाटकाचा फील कायम राखत हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर दाखल झाले असल्याने प्रत्येक बारीकसारीक गोष्टीद्वारे दोन्ही रंगभूमींचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
नाटकातील गूढ गडद करण्यात तेजस देवधर यांची प्रकाशयोजना मोठी भूमिका बजावते. त्यात सारंग कुलकर्णीच्या पार्श्वसंगीताची भर पडते. ऋषीने मल्हार विचारेसोबत केलेले नेपथ्य आणि देविका काळे यांची वेशभूषा कथानकाची मागणी पूर्ण करते.
अतिशय आव्हानात्मक असलेली गोविंदा ही व्यक्तिरेखा आरोह वेलणकर प्रचंड ताकदीने साकारतो. क्षणाक्षणाला बदलणारे चेहऱ्यावरील हावभाव, त्याची देहबोली मनातील विचारांचा महापूर दर्शविण्यासाठी पुरेशी ठरते. रेशम श्रीवर्धनकरने गूढ नायिकेच्या रूपात सुलभाच्या व्यक्तिरेखेत अचूक रंग भरले आहेत. सुरुवातीपासून नाटकात दिसणाऱ्या रहस्यमय इसमाची भूमिका प्रसाद बनारसे यांनी लीलया साकारली आहे. दिलीप जोगळेकर, धीरेश जोशी, रेणुका दफ्तरदार हे कलाकार अचूक साथ देताना दिसतात. या नाटकाचा अनुभव अवश्य घ्यायला हवा.