Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘राम मंदिराची पहिली मागणी उद्धव ठाकरेंनी केली, भाजपाचं श्रेय शून्य’, आदित्य ठाकरेंचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 14:53 IST

Aditya Thackeray: पहले मंदिर फिर सरकार ही घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. राम मंदिर बांधणीमध्ये भाजपाचं शून्य श्रेय आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

आजपासून मुंबईमध्ये होत असलेल्या विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील ठाकरे गट महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला लक्ष्य केलं जात आहे. तसेच राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचं उद्धव ठाकरे स्वागत करत आहेत, असा आरोप केला जात आहे. त्या आरोपाला आता आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पहले मंदिर फिर सरकार ही घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. राम मंदिर बांधणीमध्ये भाजपाचं शून्य श्रेय आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

याबाबत प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही दोन तीन वेळा राम मंदिराचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन आलो आहोत. पहले मंदिर फिर सरकार ही घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. राम मंदिर बांधणीमध्ये भाजपाचं शून्य श्रेय आहे. जो निकाल आला तो सर्वोच्च न्यायालयामधून आला आहे. त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा काडीमात्र संबंध नव्हता, आसा दावाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. 

यावेळी मुंबईत लावण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या बॅनरबाबत विचारलं असता, आदित्य ठाकरे यांनी त्या बॅनरकडे लक्ष देऊ नका. ज्यांच्याकडे जनता नसते ते बॅनरबाजी करतात, असा टोला लगावला. भाजपा आम्हाला ज्या प्रकारे लक्ष्य करतेय ते पाहता त्यांच्या मनामध्येही आमच्याबाबतची भीती निर्माण झालेली आहे. त्यांनाही इंडिया जिंकतंय हे जाणवत आहे. त्यांचा द्वेष हा भारताशी, त्यांचा द्वेष हा इंडियाशी आहे. त्यांचा द्वेष आमच्या देशाच्या संविधानाशी आहे. मात्र आम्ही त्यांना जिंकू देणार नाही.  महायुती म्हणजे काही नाही. काही डरपोक लोक एकत्र आलेले आहेत. हे महाराष्ट्राला पिछाडीवर घेऊन जात आहेत. आम्ही आता त्यांच्याकडे लक्ष देत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. 

टॅग्स :आदित्य ठाकरेराम मंदिरउद्धव ठाकरेभाजपा