येत्या ९० दिवसांत मुंबईचा चेहरामोहरा बदलतो - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 13:02 IST2022-10-01T13:00:03+5:302022-10-01T13:02:27+5:30
पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या ९० दिवसांत मुंबईचा चेहरामोहरा बदलतो - मुख्यमंत्री
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा चेहरामोहरा येत्या ९० दिवसांत बदलणार असून, त्यादृष्टीने मुंबई महापालिकेने काम सुरू केले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील रस्ते पुढील दोन वर्षांत खड्डेमुक्त करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान २ चा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबईचे सौंदर्यीकरण, चौकांचे सुशोभीकरण, तसेच इतर अनेक कामे मुंबईत सुरू आहेत. पुढील १० दिवसांत हे सगळे दृश्य स्वरूपात दिसेल. त्यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि त्यांची टीम दिवस-रात्र काम करीत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सत्तेवर आल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच बैठकीत मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न दूर झाला पाहिजे अशा सूचना दिल्या आहेत. त्यासाठी मुंबईतील ४५० किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.