- महेश पवार, मुंबईमहाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेला बुधवारी नव्या घडामोडींमुळे वेग आला. अलीकडच्या काही महिन्यांत ठाकरे बंधूंच्या भेटींची मालिका वाढली आहे. उद्धव यांचा वाढदिवस व राज यांच्या घरातील गणेशोत्सवानिमित्ताने झालेल्या कौटुंबिक भेटींनंतर बुधवारी झालेल्या राजकीय भेटीमुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला नवसंजीवनी मिळाली.
मुंबई महापालिकेवर वर्चस्व टिकवणे हे उद्धवसेनेसाठी मोठे आव्हान आहे. भाजपने शिंदे गटाच्या मदतीने उद्धवसेनेचा हा परंपरागत गड भेदण्याची तयारी केली आहे. अशावेळी मनसेची साथ मिळाल्यास मुंबईतील राजकीय गणिते मोठ्या प्रमाणावर बदलू शकतात, असे उद्धवसेनेला वाटते.
यामुळेच काँग्रेस नेत्यांच्या बैठकीतही उद्धव यांनी मनसेला महाविकास आघाडीत सामील करण्याचा मुद्दा पुढे आणला होता. मात्र, ठाकरे बंधूंची ही जवळीक युतीपुरती मर्यादित राहणार की महाविकास आघाडीत विस्तारित होणार, या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बदलत्या राजकीय समीकरणांची चिन्हे
उद्धवसेना व मनसेचे परस्परविरोधाचे राजकारण गेली काही वर्षे सुरू होते. मविआ सरकार कोसळल्यानंतर भाजप-शिंदे गटाने सत्ता मजबूत केली. त्यानंतर ठाकरे बंधूंनी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संवाद युतीत बदलल्यास राज्याच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडू शकतो.
या भेटीमुळे राजकारणाला नवी कलाटणी मिळाल्याचे मानले जात असून, काही दिवसांत ठाकरे बंधूंच्या राजकीय जवळिकीचा खरा परिणाम स्पष्ट होणार आहे.
यापूर्वी कधी झाल्या गाठीभेटी?
२०१० - मीनाताई ठाकरेंचा स्मृतिदिन - मातोश्री२०१२ - बाळासाहेब ठाकरेंचे अंत्यसंस्कार - शिवाजी पार्क २०१२ - आदित्य ठाकरे वाढदिवस - मातोश्री२०१२ - राज यांनी उद्धव यांना लीलावती रुग्णालयातून घरी आणले २०१५ - शरद पवारांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज-उद्धव एका व्यासपीठावर - मुंबई २०१९ - अमित ठाकरे साखरपुडा - मुंबई२०२० - अमित ठाकरे लग्न - मुंबई२०२१ - उद्धव ठाकरेंच्या मानेवरील शस्त्रक्रियेनंतर राज पवई रुग्णालयात२०२२ - राज यांच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर उद्धव यांनी दूरध्वनीवरून चौकशी केली.२०२५ - वरळी विजय मेळावा२०२५ - उद्धव ठाकरे वाढदिवस - मातोश्री२०२५ - गणेशोत्सव दर्शन - शिवतीर्थ २०२५ - शिवतीर्थ (दसरा मेळाव्यासाठी चर्चा)