मिठीचा काठ बहरणार, मुंबई सुंदर होणार; नदीकाठच्या मनोरंजनासाठीची जागा विकसित करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 14:47 IST2023-05-18T14:46:55+5:302023-05-18T14:47:08+5:30
मिठी नदीच्या काठाचा भाग हा महापालिका आणि एमएमआरडीएने विभागून घेतला आहे. बीकेसीमधील बराचसा भाग हा प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असून, उर्वरित भाग महापालिकेच्या अखत्यारित येत आहे.

मिठीचा काठ बहरणार, मुंबई सुंदर होणार; नदीकाठच्या मनोरंजनासाठीची जागा विकसित करणार
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतून वाहणाऱ्या मिठी नदीच्या सौंदर्यकरणासाठी मुंबई महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. मात्र तरीही मिठी नदी गाळातच रुतली असून, बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीनेही नदीला फार काही दिलासा दिलेला नाही. असे असतानाच, आता पुन्हा एकदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मिठी नदीच्या काठच्या मनोरंजनासाठीची जागा विकसित करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
मिठी नदीच्या काठाचा भाग हा महापालिका आणि एमएमआरडीएने विभागून घेतला आहे. बीकेसीमधील बराचसा भाग हा प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असून, उर्वरित भाग महापालिकेच्या अखत्यारित येत आहे. मिठी नदी काठच्या सौंदर्यकरणासाठी दोन्ही प्राधिकरणांनी यापूर्वी कोटयवधी रुपये खर्च केले असून, आता पुन्हा एकदा मिठी नदी काठच्या वांद्रे - कुर्ला संकुला येथील जी ब्लॉकमधील मनोरंजनासाठीची जागा व संलग्न सुविधा विकसित करण्याकरिता तत्त्वावर चालविण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार असून, यासाठी निविदा जारी केली आहे.
- स्थळी पाहणी ३० मे रोजी होणार असून, निविदापूर्व बैठक २ जून रोजी प्राधिकरणाच्या बीकेसीमधील मुख्यालयात होणार आहे.
- निविदा प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख १७ जुलै आहे.
- निविदा प्रस्ताव १७ मे पासून सुरू झाला असून, शंका निरसनाकरिता प्रश्न प्राप्त होण्याचा दिनांक ३० मे आहे.
- या संदर्भातील इसारा मूल्य बँक हमीद्वारे २ कोटी, तर निविदा शुल्क ११ हजार ८०० रुपये आहे.