बाइक टॅक्सी अपघाताचा चालक ठरला पहिला बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:48 IST2025-10-09T09:46:58+5:302025-10-09T09:48:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत तीन अपघातांत दोघांचा बळी गेला असून, दोन जण जखमी आहेत. यातील एका ...

बाइक टॅक्सी अपघाताचा चालक ठरला पहिला बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत तीन अपघातांत दोघांचा बळी गेला असून, दोन जण जखमी आहेत. यातील एका अपघातात बाइक टॅक्सी सेवेमधील एका चालकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. अरविंद अशोक कोलगे (४५) असे मृत चालकाचे नाव असून, ते उबेर ॲपवरून बुक केलेल्या ॲक्टिव्हा (एमएच ०२ एफपी ३३९१) स्कूटरचे चालक होते. कोलगे हे बाइक टॅक्सी अपघातातील पहिला बळी ठरले आहेत.
कोलगे हे प्रवासी कौस्तुभ दीक्षित यांना घेऊन जात असताना, चेंबूरच्या पूर्व द्रूतगती मार्गावर भरधाव मिक्सर ट्रकने त्यांना मागून जोरदार धडक दिली. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी एसएलआर ब्रिजजवळ घडली. धडकेनंतर अरविंद कोलगे हे थेट ट्रकच्या चाकाखाली आले व ५० फुटांपर्यंत फरफटत गेले. गंभीर अवस्थेत त्यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तासाभरातच मृत घोषित केले.
निवृत्त सिडको अधिकारी, पत्नी गंभीर जखमी
पनवेल-सायन रोडवरील उमरशी बाप्पा चौक येथे १ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता एक पाण्याच्या टँकर कारला जोरदार धडक दिली. या अपघातात निवृत्त सिडको अधिकारी तुळशीदास लक्ष्मण परब (६०) व त्यांची पत्नी अनिता (५८) गंभीर जखमी झाले. अपघातानंतर टँकर चालक पसार झाला. याप्रकरणी चेंबूर गुन्हा नोंदवला आहे.
मानखुर्दमध्ये अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
सायन-पनवेल हायवेवर दुचाकीला भरधाव वाहनाने मागून धडक दिली. या अपघातातील जखमी युनूस खान (४५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धडकेत ते रस्त्यावर २५ फूट लांब फेकले गेले व पुढे एका ट्रॅव्हल्सच्या मागच्या चाकाखाली आले. त्यांचे दोन्ही पाय चिरडले गेले. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते.