दरवाजा उघडा राहिला; लाखोंचा माल चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 10:17 IST2023-11-26T10:16:51+5:302023-11-26T10:17:14+5:30
Mumbai Crime News: अनेकवेळा गावी जाताना घरावर लक्ष ठेवा, असे शेजाऱ्यांना सांगितले जाते. त्याचप्रमाणे मालाड पश्चिमला राहणारे माजीद शेख (४३) यांनी देखील उस्मानाबादला जाताना शेजाऱ्यांना झाडाला पाणी घालायला सांगून गेले.

दरवाजा उघडा राहिला; लाखोंचा माल चोरीला
मुंबई - अनेकवेळा गावी जाताना घरावर लक्ष ठेवा, असे शेजाऱ्यांना सांगितले जाते. त्याचप्रमाणे मालाड पश्चिमला राहणारे माजीद शेख (४३) यांनी देखील उस्मानाबादला जाताना शेजाऱ्यांना झाडाला पाणी घालायला सांगून गेले. मात्र, हे करताना त्यांचे शेजारी घराचा दरवाजा बंद करायला विसरले. याचा फायदा घेत चोरांनी जवळपास लाखो रुपयांचा मुद्देमाल शेख यांच्या घरातून पळवून नेला.
शेख यांच्या तक्रारीनुसार ते कुटुंबासह गावी गेले होते. त्याआधी निघताना त्यांनी शेजारी शमीम खान यांना घराची चावी देत घरातल्या झाडांना पाणी द्यायला सांगितले. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता शेख यांच्या मामाचा मुलगा मोबीन पटेल यांनी तुमच्या घराचा दरवाजा उघडा असून साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आहे, असे शेखना कळवले.
मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल
चोरी झाल्याची माहिती मिळताच शेख गावाहून मालाडच्या घरी परतले आणि त्यांनी शमीम यांना याबाबत विचारले. त्यावर झाडाला पाणी दिल्यानंतर घराचा दरवाजा बंद करायला मी विसरलो, असे त्यांनी शेख यांना सांगितले. याप्रकरणी अखेर २३ नोव्हेंबर रोजी मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी जवळपास १ लाख १० हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.