मुंबई - महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून ठाकरे बंधू यांच्या युतीत वाद उभा राहिला होता. उद्धव ठाकरे यांनी ३ स्वीकृत नगरसेवकांची निवड केल्याने मनसे नाराज झाली होती. मनसेकडून एका स्वीकृत नगरसेवकाची मागणी करण्यात आली होती मात्र ही मागणी उद्धव ठाकरेंनी नाकारली. यानंतर प्रभाग समिती अध्यक्ष निवडीपासून दूर राहण्याची भूमिका मनसेने घेतली. अखेर मनसे कार्यालयात आमदार वरूण सरदेसाई, मनसे नेते संदीप देशपांडे आणि गटनेते यशवंत किल्लेदार यांची बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याचे समोर आले आहे.
बैठकीनंतर आमदार वरूण सरदेसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, निवडणुकीच्या निकालानंतर ज्या प्रभाग समितीचे वाटप असते त्यासाठी बैठका घ्याव्याच लागतात. राज्यसभेची निवडणूक आहे, त्यासाठी जयंत पाटील, सुप्रिया सुळे मातोश्रीवर आले होते. आज हर्षवर्धन सपकाळ विधिमंडळात आले. त्यामुळे राजकारणात कुठलीही भूमिका मांडायची असेल तर चर्चा करावीच लागते. त्याकडे वेगळ्या अर्थाने पाहायची गरज नाही. आम्ही ग्राऊंड पातळीवर शिवसैनिक, मनसैनिकांनी ठाकरेंचा उमेदवार म्हणून मनापासून काम केले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्तम समन्वय आहे असं त्यांनी सांगितले.
तर आजच्या बैठकीत प्रभाग समितीबाबत चर्चा झाली. प्रभाग समिती कुणाला कुठे संधी द्यायची, किती वर्ष अध्यक्षपद घ्यायचे याबाबत विस्तृत चर्चा झाली. या चर्चेत आमचे एकमत झाले असून योग्य निर्णय आम्ही घेतला आहे. पक्षातंर्गत बैठकीतले विषय सगळे माध्यमासमोर बोलता येत नाही. माध्यमांमध्ये आम्ही अनेक बातम्या पाहिल्या परंतु आम्ही कुठलीही भूमिका जाहीर केली नव्हती. आज वरूण सरदेसाई आले त्यांच्यासोबत बैठक झाली. त्यामुळे मनसे-उद्धवसेना एकत्रितपणे प्रभाग समिती निवडणूक लढवणार आहोत असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जाहीर केले.
दरम्यान, निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीमुळे उद्धव ठाकरे नाराज होते. त्यात स्वीकृत नगरसेवकपदाच्या ३ जागांपैकी एक जागा मनसेने मागितलेली असतानाही उद्धव ठाकरेंकडून ती मागणी नाकारण्यात आली. त्यामुळे मनसेने प्रभाग समिती निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचे पुढे आले होते. परंतु संजय राऊत यांनी शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये २०-२५ मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर वरूण सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत मनसेची नाराजी दूर करण्यात उद्धवसेनेला यश आले. त्यामुळे प्रभाग समिती निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला.
Web Summary : The dispute between Thackeray brothers over corporator selection is resolved. A meeting between Uddhav Sena and MNS leaders led to an agreement to jointly contest the ward committee elections. MNS's concerns were addressed after discussions, ending their neutrality stance.
Web Summary : ठाकरे बंधुओं के बीच पार्षद चयन पर विवाद सुलझा। उद्धव सेना और मनसे नेताओं के बीच बैठक में वार्ड समिति चुनाव संयुक्त रूप से लड़ने पर सहमति बनी। मनसे की चिंताओं को दूर किया गया, जिससे उनका तटस्थ रुख समाप्त हो गया।