'तो' निर्णय आता मागे घ्यायला हवा, निर्बंधावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 17:22 IST2022-02-21T17:06:39+5:302022-02-21T17:22:19+5:30
High Court Case : कोरोनाकाळात एवढे छान काम केल्यानंतर आता परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असताना राज्याचं नाव बदनाम का करताय? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने त्यावेळी उपस्थित केला.

'तो' निर्णय आता मागे घ्यायला हवा, निर्बंधावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं
मुंबई - लोकल ट्रेन, मॉल्स, कार्यालयं येथे केवळ लसीकरण पूर्ण झालेल्याच व्यक्तींना प्रवेश देण्याचा निर्णय आता मागे घ्यायला हवा, असे निर्देश मुंबईउच्च न्यायालयाने दिले आहेत. कोरोनाकाळात एवढे छान काम केल्यानंतर आता परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असताना राज्याचं नाव बदनाम का करताय? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने त्यावेळी उपस्थित केला.
मुंबई लोकलसाठी कोरोना लससक्ती करण्याचा तत्कालीन मुख्य सचिवांनी काढलेला आदेश हा कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे घेतलेला नसल्याचे दिसून येते, असे मुंबई उच्च न्यायालायने गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. तसेच मुंबई लोकलसाठी लससक्तीचा तत्कालीन मुख्य सचिवांचा आदेश मागे घेणार की नाही हे विद्यमान मुख्य सचिवांशी सल्ला मसलत करून उद्या सांगा असे मुख्य न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील खंडपीठाचे विशेष सरकारी वकिलांना तोंडी निर्देश देण्यात आले आहेत.
'कोरोना संकटाच्या परिस्थितीत आता सुधारणा झाली आहे आणि महाराष्ट्र सरकारने हे संकट चांगल्या पद्धतीने हाताळले आहे. मग कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे नसलेला प्रमाणित कार्यप्रणालीचा आदेश कायम ठेवून राज्याच्या प्रतिमेला धक्का बसेल, अशी परिस्थिती का ओढवून घेताय?', असा प्रश्न राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे.