आजही 'त्या' जखमा ताज्याच ! पतंगाची डोर तोडतेय अनेकांचे आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 08:23 IST2026-01-15T08:23:23+5:302026-01-15T08:23:23+5:30
जखमा भरून आल्या, पण मनावरची भीती आजही तशीच आहे.

आजही 'त्या' जखमा ताज्याच ! पतंगाची डोर तोडतेय अनेकांचे आयुष्य
मुंबई : मकरसंक्रांतीत सहायक पोलिस निरीक्षक राकेश गवळी यांच्या मनात एकच भीती दाटून येते. दुचाकीचा वेग नकळत कमी होतो, मान सतर्कपणे राकेश गवळी आजूबाजूला वळते. कुठून तरी नायलॉनच्या मांजाची दोर गळ्याभोवती अडकू नये, हीच धास्ती. कारण चार वर्षापूर्वी, हाच मांजा त्यांच्या गळ्याला चिरत गेला होता. त्यामुळे माझ्यासोबत जे घडले, ते कुणाच्या वाट्याला येऊ नये, या भावनेतून गवळी मकरसंक्रांतीच्या दिवसांत रस्त्यावर उभे राहून नागरिकांना वाहने हळू चालवण्याचे आवाहन करतात. उड्डाणपूल, रहिवासी इमारती, रस्त्यालगत कोणीही पतंग उडवू नये, नायलॉन मांजाचा वापर टाळावा, असे सांगताना दिसतात.
जानेवारी २०२१ मध्ये, सत्र न्यायालयातील कामकाज आटोपून दुचाकीवरून पोलिस ठाण्याकडे येत असताना, जे. जे. उड्डाणपुलावर नायलॉनच्या मांजाने त्यांचा गळा चिरला. क्षणभरात रक्तबंबाळ झाले, श्वास अडखळला. सुदैवाने जीव वाचला, मात्र गळ्याला दहा टाके पडले.
जखमा भरून आल्या, पण मनावरची भीती आजही तशीच आहे. उड्डाणपुलालगतच्या सीताबाई नावाच्या पडक्या इमारतीवरून काही तरुण पतंग उडवत होते. एम. आर. ए. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला, तपासही झाला, दोषारोपपत्र दाखल झाले; पण आरोपी सापडला नाही. दोन वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी त्या जागेजवळून जाताना सहाय्यक पोलिस निरीक्षक गवळी यांच्या मनात ती भीती कायम असते.
पोलिसासह दोघांचा मृत्यू
१४ जानेवारी २०२३ रोजी मांजामुळे माजामुळ मोहम्मद शेख इजराईल फारुखी (२१) याचा मृत्यू तर जालिंदर भगवान नेमाने (४१) गंभीर जखमी झाले आहेत. १२ डिसेंबरला २०२४ रोजी कर्तव्य बजावून पश्चिम द्रुतगती मार्गावरून घरी जात असताना मांजामुळे हवालदार समीर जाधव यांचा मृत्यू झाला होता. ते दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
नायलॉनचा मांजा वापराल तर कठोर कारवाई
नायलॉनचा मांजा आणि काचेची कोटिंग असलेल्या मांजाची विक्री, साठा, वापर यावर बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पक्ष्यांसाठीही जीवघेणा
मांजा केवळ दुचाकीस्वारांसाठीच नव्हे, तर पादचारी, शाळकरी मुले, पक्ष्यांसाठीही जीवघेणा ठरत आहे. पक्ष्यांच्या पंखात, गळ्यात मांजा अडकून ते गंभीर जखमी होतात. नायलॉन मांजा तुटत नाही, कुजत नाही. पर्यावरणावर त्याचा परिणाम दीर्घकाळ राहतो, असे मानद पशु कल्याण अधिकारी सुनिष सुब्रमण्यन सांगतात.