‘त्या’ मुलाचा ताबा काळजीवाहू व्यक्तीलाच! मुंबई उच्च न्यायालयाने कोणता निर्णय दिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 10:07 IST2025-05-01T10:06:34+5:302025-05-01T10:07:07+5:30
पालक नसलेल्या अल्पवयीन मुलीचा ताबा त्याच्या आजी-आजोबांकडे न देता उच्च न्यायालयाने त्याचा ताबा मुलाची काळजीवाहू असलेल्या त्याच्या मावशीला दिला. या दोघांमध्ये असलेला जिव्हाळा पाहता व मुलाच्या भावनिक गरजांच्या महत्त्वावर भर देत वरील निर्णय घेतला.

‘त्या’ मुलाचा ताबा काळजीवाहू व्यक्तीलाच! मुंबई उच्च न्यायालयाने कोणता निर्णय दिला?
मुंबई : पालक नसलेल्या अल्पवयीन मुलीचा ताबा त्याच्या आजी-आजोबांकडे न देता उच्च न्यायालयाने त्याचा ताबा मुलाची काळजीवाहू असलेल्या त्याच्या मावशीला दिला. या दोघांमध्ये असलेला जिव्हाळा पाहता व मुलाच्या भावनिक गरजांच्या महत्त्वावर भर देत वरील निर्णय घेतला. आठ वर्षांच्या मुलाच्या आईचा २०२१ मध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. तर २०२३ मध्ये मुलाच्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर मुलगा त्याच्या ‘काळजीवाहू’ मावशीकडे राहत होता. मुलाच्या पालकांच्या मृत्यूनंतर त्याच्या आजी-आजोबांनी २०२४ मध्ये पालकत्व याचिका दाखल केली. अल्पवयीन मुलाचे संगोपन करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्थिर असल्याचे आजी-आजोबांनी याचिकेत म्हटले आहे. दुसरीकडे, मुलाच्या आईची चुलत बहीण जी मुलाच्या आईच्या मृत्यूपूर्वी मुलाची काळजी घेत होती, तिने असा दावा केला की, मुलाच्या आईच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी जुलै २०२३ मध्ये एक प्रतिज्ञापत्र दाखल केले.
...म्हणून मावशीला दिला ताबा
मुलाच्या हिताचा विचार करत न्या. आर. आय. छागला यांच्या एकलपीठाने म्हटले की, अल्पवयीन मुलाबद्दल दोन्ही पक्षांची ओढ आणि भावना यांच्यात संतुलन राखणे आवश्यक आहे. मुलगा अल्पवयीन असल्याने न्यायालयाने समुपदेशकाच्या अहवालाचा आधार घेतला. या अहवालात मुलगा मावशीशिवाय अन्य कोणाकडेही राहू शकत नसल्याचे म्हटले आहे. त्या दोघांमधील जिव्हाळा पाहता न्यायालयाने मुलाचा ताबा आणि पालकत्व मावशीला दिले.
मे २०२४ मध्ये पालकत्व याचिका
मावशी मुलाला भेटू देत नसल्याचा आरोप करत आजी-आजोबांनी मावशीविरोधात काशिमिरा पोलिस ठाण्यात आणि सीडब्ल्यूसीकडे तक्रार केली. सीडब्ल्यूसीने डोंबिवलीमधील एका बालगृहात मुलाला ठेवण्याचे आदेश दिले. त्याविरोधात मुलाच्या मावशीनेही न्यायालयात याचिका दाखल केली. नोव्हेंबर २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने मावशीच्या बाजूने आदेश देत मुलाचा ताबा तिच्याकडे दिला. त्यानंतर आजी-आजोबांनी मे २०२४ मध्ये पालकत्व याचिका दाखल करत मावशीचे मुलावर असलेले नियंत्रण पाहता ती मुलाच्या कोमल मानसिकतेला हानी पोहचवू शकते, असा आजी-आजोबांनी युक्तिवाद केला होता.