मुंबई: मराठा आंदोलकांनी दक्षिण मुंबईतील महत्त्वाचे रस्ते अडवल्याने वाहतूक कोंडी झाली. यामुळे संपूर्ण शहराचे जीवन ठप्प केल्याबाबत ॲमी फाउंडेशनने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अंतरिम अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान जो युक्तिवाद झाला, तो जसाच्या तसा असा...
न्यायालय: तुम्ही वाहतूक कोंडी कशी करू शकता? आणि न्यायमूर्तींच्या गाडीचा जाण्या-येण्याचा मार्ग कसा अडवू शकता? राज्य सरकार परिस्थितीला कसे हाताळणार? ते जर नियमांचे उल्लंघन करत आहेत तर तुम्ही (सरकार) आंदोलन का थांबवत नाही?
महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ: आज त्यांना आझाद मैदानावर बसण्याची परवानगी नाही. त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे आणि दिलेल्या आश्वासनांचे उल्लंघन केले आहे.
न्यायालय: न्यायालयाबाहेर जो आवाज ऐकत आहात त्यावरून तुम्हाला हे शांततापूर्ण आंदोलन वाटते का? आझाद मैदानात का जात नाही? चर्चगेट, मरीन ड्राईव्ह , फ्लोरा फाऊंटन, मंत्रालयाच्या परिसरात काय करत आहात? तुम्ही म्हणालात की शांततापूर्ण आंदोलन करू शांतता कुठे आहे? आम्हाला शहर पूर्ववत झालेले दिसले पाहिजे. आम्हाला आंदोलनकर्त्यांचीही चिंता आहे. एकाचा मृत्यू झाला ही गंभीर बाब आहे. मुंबईतले सगळे महत्त्वाचे रस्ते बंद झाले आहेत आणि तरीही तुम्हाला यातले काही माहीत नाही, असे नाटक करू शकत नाही. मुंबईच्या लोकलच्या गर्दीपेक्षा याठिकाणी अधिक माणसांची गर्दी आहे. तुम्ही रस्त्यावरच जेवण बनवत आहात.
जरांगे आणि आंदोलकांच्या वकिलांचा युक्तिवाद: जाणूनबुजून आंदोलकांची गैरसोय करण्यात येत आहे. शौचालये बंद करण्यात आली आहेत. सगळी हॉटेल्स उशिरा उघडण्यात येतात. पाणी मिळत नाही. अन्नाची पाकिटे आणणारा ट्रक अडविला जातो. पाऊस पडत असल्याने गैरसोय होत आहे.
न्यायालय: तुम्हाला रस्त्यावर कार्पेट टाकून हवे आहे? हवामान खाते वारंवार पावसाचा इशारा देत असतानाही तुम्ही आलात. पावसाळा सुरू आहे, हे तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही चिखलात बसणे निवडले. गणेशोत्सव आहे, हे तुम्हाला माहीत नाही? तुम्ही मुंबई ठप्प केली. कामाला जाणाऱ्यांची, विद्यार्थ्यांची गैरसोय केली. दूध, भाज्यांची वाहतूक कशी करणार? तुम्ही (वकील) जरांगे यांना समजवा. कायद्याचे पालन करणारे नागरिक म्हणून तुम्ही (जरांगे) न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार का? ५००० पेक्षा अधिक असलेल्या आंदोलकांना परत जाण्यास सांगाल का? मंगळवारी तशा आशयाची पत्रकार परिषद घेणार का?
जरांगे यांचे वकील श्रीराम पिंगळे: ते कठीण आहे. मात्र, रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी सरकारला वानखेडे आणि ब्रेबॉन स्टेडियम उघडण्यास सांगा. तिथे ही लोक जातील आणि पावसात त्यांना आश्रय मिळेल. न्यायालय : ही दोन्ही स्टेडियम आयकॉनिक आहेत. तुम्ही तिकडची क्रिकेटचे पीच खराब कराल. लोक कबड्डी, क्रिकेट खेळताना दिसत आहेत. नाचतानाचेही व्हिडीओ आहेत. तुम्हाला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे नाही.
न्यायालयाचे निरीक्षणमहाधिवक्ता: प्रतिवादींनी दररोज मुंबईत लाखो लोक येतील आणि संपूर्ण महाराष्ट्र ठप्प करतील. मुंबई शहर अक्षरशः ठप्प असल्याचे दिसते. आझाद मैदानाच्या आजूबाजूचा भाग उदा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिकेचे कार्यालय, मंत्रालय, फ्लोरा फाउंटन आणि पी'डेमेलो रोड या ठिकाणी आंदोलकांची गर्दी उसळली आहे. आंदोलक या ठिकाणी नाच करतात, कबड्डी खेळतायेत स्वयंपाक करतात आणि आंघोळही करतात.
न्या. रविंद्र घुगे: आज आम्ही जेव्हा दुपारी साडेबारा वाजता कारने उच्च न्यायालयात येत होतो त्यावेळी सिटी सिव्हिल कोर्टाच्या व न्यायालयाच्या परिसरात मोठी गर्दी होती. आंदोलक रस्त्यावर खेळत होते व काहीजण झोपले होते. आम्ही सिव्हील कोर्टाच्या पदपथावरून चालत न्यायालयात पोहोचलो. सरकारी वकील पौर्णिमा कंथारिया यांनाही चालतच उच्च न्यायालयात यावे लागले. न्यायालयाचे खिडक्या व दरवाजे बंद करून सुनावणी सुरू असतानाही बाहेरून करण्यात येणाऱ्या घोषणाबाजी आम्हाला आणि वकिलांना स्पष्टपणे ऐकायला येत होत्या. न्यायालय जवळजवळ बंदिस्तच होते.