Join us

उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद, पाहा महत्वाचे मुद्दे

By मुकेश चव्हाण | Updated: February 26, 2023 19:46 IST

सर्व पक्षांनी लोकायुक्ताच्या कायद्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. 

मुंबई: राज्याचं उद्यापासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापान कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री, आमदारांनी उपस्थिती लावली. विरोधकांनी मात्र चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला.

विरोधकांनी आज चहापानावर बहिष्कार घातला. त्यांच्यासोबत चहापान टळलं हे बरंच झालं. सत्ता गेल्यामुळे विरोधक वैफल्यग्रस्थ झाले आहेत. त्यामुळे आम्ही समजू शकतो. लोकशाहीत बहूमताला महत्व आहे. आमचं सरकार हे बहूमताचं सरकार आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. विरोधकांनी सकारात्मक मुद्दे मांडावेत, त्याच्यावर चर्चा केली जाईल. या अधिवेशनातून आम्ही जनतेच्या प्रश्नांवर भर देऊ. रखडलेल्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. अनेक प्रकल्प सुरू केले आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. 

उद्यापासून सुरू होत असलेल्या अधिवेशनात लोकहिताचे निर्णय घेतले जातील. विरोधकांनी विधीमंडळात लोकहिताचे मुद्दे मांडवेत. त्यांच्या प्रश्नावर उत्तरं द्यायला आम्ही तयार आहोत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच लोकायुक्तांचं विधेयक पास करण्यचा या विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रयत्न असेल. सर्व पक्षांनी लोकायुक्ताच्या कायद्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. 

राज्यात सध्या सुरू असलेल्या तीव्र राजकीय संघर्षाचे तीव्र पडसाद सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. २४ मार्चपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात ९ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होईल. शिवसेनेतील सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला असून आरोप- प्रत्यारोपांचा धुराळा उठला असताना सत्ताधारी भाजप- शिंदे सेना विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात अधिवेशनातही कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळेल, अशी चिन्हे आहेत. 

विधिमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयाच्या ताब्यावरून दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे. १४ मार्चपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. कसबा आणि पिंपरी- चिंचवडमधील विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल २ मार्चला लागणार असून त्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघेल आणि अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटतील.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अर्थसंकल्पीय अधिवेशनमहाराष्ट्र सरकारएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस