गिनीमध्ये मृत्यू झालेल्या भारतीय कामगाराचे पार्थिव गोरेगावला येणार, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 22:33 IST2025-08-25T22:32:49+5:302025-08-25T22:33:46+5:30
गिनी प्रजासत्ताकात काम करताना दुर्दैवाने मृत्यू झालेल्या गोरेगावच्या आरे कॉलनी येथील रहिवासी राजेश घोलप यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात येणार आहे.

गिनीमध्ये मृत्यू झालेल्या भारतीय कामगाराचे पार्थिव गोरेगावला येणार, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा पुढाकार
मुंबई-उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी गिनी प्रजासत्ताकात काम करताना दुर्दैवाने मृत्यू झालेल्या गोरेगावच्या आरे कॉलनी येथील रहिवासी राजेश घोलप यांचे पार्थिव मुंबईत परत आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मृत व्यक्ती गोयल यांच्या उत्तर मुंबई मतदारसंघातील नसतानाही, कुटुंबाची व्यथा समजताच त्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. पार्थिव आणण्यासाठी कुटुंबाला प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत गोयल यांनी व्यक्तिगतरीत्या गिनीतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. दूतावासाने स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत प्रक्रिया जलद करण्यासाठी प्रयत्न केले.
त्यांच्या प्रयत्नांमुळे उद्या राजेश घोलप यांचे पार्थिव मुंबईत आणले जात असून यामुळे दुःखी कुटुंबाला दिलासा मिळणार आहे.
आपली शोकसंवेदना व्यक्त करताना पियूष गोयल म्हणाले की,अशा दुःखद प्रसंगी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या दूतावासाच्या सहकार्याने आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने दिवंगत राजेश घोलप यांचे पार्थिव शक्य तितक्या लवकर त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवता आले, याचे मला समाधान आहे.