Join us
Daily Top 2Weekly Top 5

'त्यामुळेच मुख्यमंत्र्यांवर विठ्ठल पूजेपासून पळ काढण्याची वेळ आली' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 18:16 IST

राज्यातील जनतेला सातत्याने दिलेली खोटी आश्वासने आणि जुमलेबाजी मुख्यमंत्र्यांच्या अंगाशी आली आहे.

मुंबई - राज्यातील जनतेला सातत्याने दिलेली खोटी आश्वासने आणि जुमलेबाजी मुख्यमंत्र्यांच्या अंगाशी आली आहे. जनतेची फसवणूक केल्यामुळेच आषाढी एकादशीचीला पंढरपूरला विठूरायाच्या शासकीय महापूजेची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा खंडित करून पळ काढण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अशोक चव्हाण यांनी केली आहे.

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाच्या शासकीय महापूजेची परंपरा यावर्षी खंडीत झाली, याचे दुःख काँग्रेस पक्षाला आहे. पण, मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणामुळेच ही वेळ त्यांच्यावर आली आहे.  राज्यातील जनतेला मुख्यमंत्री आणि सरकारने वेळोवेळी दिलेली आश्वासने पाळली असती तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. समाजातील प्रत्येक वर्ग हा जुमलेबाजीमुळे त्रस्त असून त्यांविरोधात आक्रोश व्यक्त करत आहे. मराठा आरक्षण असो, धनगर समाजाला आरक्षण असो किंवा मुस्लिमांना न्यायालयाने मान्य केलेले आरक्षण असो, सरकारने आपला शब्द पाळला नाही. त्यामुळेच या समाजांमध्ये तीव्र संताप आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे, शिक्षकांचे समाजातील इतर वर्गांचेही अनेक प्रश्न सरकारने सोडवले नाहीत. जनतेच्या संतापाचा सामना करावा लागू नये म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या महापूजेला न जाण्याची पळवाट शोधली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना आरक्षणाच्या प्रश्नापासून पळ काढता येणार नाही. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची आणि खरे बोलण्याची सद्बुद्धी विठ्ठलाने मुख्यमंत्र्यांना द्यावी अशी प्रार्थना आषाढी एकादशीला विठुरायाकडे करू, असेही शेवटी चव्हाण यांनी म्हटले.

टॅग्स :आषाढी एकादशीपंढरपूर वारीदेवेंद्र फडणवीसअशोक चव्हाण