Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं ! हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश करणार गृहमंत्री अनिल देशमुखांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 12:43 IST

गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंमार्फत पोलीस दलाला १०० कोटी कलेक्शनचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला, या आरोपानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती

ठळक मुद्देमाझ्यावर मुंबई चे पोलीस आयुक्त यांनी जे आरोप केले आहेत, त्याची चौकशी करावी अशी मागणी मी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना केली होती. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली आहे.

नागपूर : उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani Bomb Scare) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, या प्रकरणात NIA ने वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली, या प्रकरणाचा धागेदोरे शोधण्यासाठी NIA तपास करत आहेत, यातच वाझेंचे निलंबन करत ठाकरे सरकारनं मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग(Param Bir Singh) यांचीही उचलबांगडी केली, सध्या राज्यात सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचे प्रकरण गाजत आहे. याप्रकरणी, अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात येणार आहे. स्वत: अनिल देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंमार्फत पोलीस दलाला १०० कोटी कलेक्शनचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला, या आरोपानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याप्रकरणी अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे, या पत्रात म्हटलंय की, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना १७ मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप केलेत, त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नाही. त्यामुळे त्यांनी जे आरोप लावले आहेत, या संपूर्ण प्रकरणाची त्वरीत चौकशी करून दुधका दुध, पानीका पानी करावं अशी मागणी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, मंत्रिमंडळ बैठकीतही ही मागणी केली होती, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. 

माझ्यावर मुंबई चे पोलीस आयुक्त यांनी जे आरोप केले आहेत, त्याची चौकशी करावी अशी मागणी मी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना केली होती. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली असून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या आरोपाची चौकशी होणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. तसेच, जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, काँग्रेसनेही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फतच चौकशी करावी, असे मंत्रिमंडळ बैठकीत म्हटल्याचे नाना पटोले यांनी सांगितलं आहे. त्यामुळे, आता या चौकशीसाठी कोणत्या न्यायाधीशांना नेमण्यात येईल आणि चौकशीनंतर काय सत्य बाहेर येईल, याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.  

गृहमंत्र्यांनी तेल ओतले

मनसुख हिरेन व अँटिलिया स्फोटक प्रकरणात राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली. सिंग हे महत्त्वाकांक्षी अधिकारी आहेत. होमगार्ड महासंचालक पदावरील बदली ते सहन करू शकले नाहीत. त्यांच्या अस्वस्थतेत तेल ओतले ते गृहमंत्री देशमुखांनी. पोलीस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावे लागले असे एक विधान देशमुखांनी करताच परमबीर सिंग यांनी 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्र्यांनी कसे दिले होते, अशा पत्राचा स्फोट केला. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असलेला सचिन वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. 

तर फडणवीसांचीही चौकशी करावी

महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून भाजपचे राज्यातील नेते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करीत असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यात आघाडीवर आहेत. फडणवीस हे बेछूट आणि बेलगाम आरोप करीत असून सातत्याने खोटे बोलत आहेत. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केली. केंद्रीय तपासणी यंत्रणांना हाताशी धरून ते महाराष्ट्राची बदनामी करीत आहेत. वेळ पडली तर सरकारने फडणवीसांचीही चौकशी करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली. 

टॅग्स :अनिल देशमुखपरम बीर सिंगमनसुख हिरणमुख्यमंत्री