जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन; सुनावणीदरम्यान कोर्टात नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 15:36 IST2022-11-15T15:24:50+5:302022-11-15T15:36:20+5:30
माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आज त्यांनी दाखल केलेल्या विनयभंगाच्या आरोपांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली.

जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन; सुनावणीदरम्यान कोर्टात नेमकं काय झालं?
मुंबई- माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आज त्यांनी दाखल केलेल्या विनयभंगाच्या आरोपांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर ठाण्याचे सत्र न्यायाधीश प्रणय गुप्ता यांनी निर्णय दिला.
आव्हाड यांच्या विरोधात राजकिय वैमनस्यातून भाजपच्या पदाधिकारी महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून यात स्पर्श करण्यामागे तसा कोणताही कथित आरोपी तथा आपले अशील आव्हाड यांचा हेतू नव्हता. मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात गर्दी झाल्यामुळे ती बाजूला करताना त्यांनी बाजूला सरण्यास सांगताना तिला हात लागला, असे सांगत आव्हाड यांचे वकील गजानन चव्हाण यांनी घटनास्थळी असलेला व्हिडिओ देखिल न्यायालयात सादर केला.
हा विनयभंगाचा गुन्हा होउ शकत नसल्याचा युक्तिवाद केला. त्यावर सरकारी वकील वर्षा चंदने यांनी मात्र जमिनीला आक्षेप घेत फिर्यादी महिलेने हा प्रकार घडल्यानंतर तातडीने मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे सांगून यात राजकीय दबाव नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय, वर्तकनगर च्या गुन्ह्यात १२ नोव्हेंबर रोजी दिलेल्या जमिनाच्या अटींमध्ये पुन्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा न करण्याची अटही, त्यांनी मोडली. जो व्हिडिओ सादर केला, त्यातही तिला स्पर्श केल्याचे स्पष्ट दिसते. आरोपी स्वतः आमदार असल्यामुळे तपासात दबाव आणण्याचीही शक्यता आहे. या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्या. गुप्ता यांनी निर्णय दिला.