Join us

थलैवा... कठीण काळातही ठाकरेंना नाही विसरले, रजनीकांत भेटीसाठी 'मातोश्री'वर आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 16:13 IST

रजनीकांत यांनी मातोश्रीवर येऊन भेट घेतल्याने अनेक अर्थ काढले जात आहेत. 

मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार आणि टॉलिवूडचा थलैवा रजनीकांत यांनी मुंबईत आल्यानंतर आवर्जून मातोश्री या निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेतली. स्वत; आदित्य ठाकरे यांनी फोटो शेअर करत ही माहिती दिली. आदित्य यांच्या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबद्दल माहिती मिळू शकली नाही. मात्र, ठाकरेंचा कठीण काळ सुरू असताना रजनीकांत यांनी मातोश्रीवर येऊन भेट घेतल्याने अनेक अर्थ काढले जात आहेत. 

बाळासाहेब हे चित्रपटशौकीन आणि कलाकारांचे स्नेही होते, त्यामुळेच दिग्गज कलाकारही बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर जात होते. यापूर्वीही रजनीकांत यांनी बाळासाहेबांना भेटून त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं होतं. सन २०१० मध्ये रजनीकांत यांचा 'रोबोट' म्हणजेच तामीळ भाषेतला 'एंद्रीयन' हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निमित्तानं रजनीकांत मुंबईत आले होते. त्या वेळी त्यांनी बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार, दुपारच्या वेळेत भेटून त्यांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, तामिळचं राजकारण आणि सिनेसृष्टीबद्दलही मनमोकळेपणाने गप्पा मारल्या होत्या. दरम्यान शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे त्या भेटीचे साक्षीदार होते.

राज्याच्या राजकारणात शिवसेनेसाठी हा कठिण काळ सुरू आहे. अनेक जवळचे दूर निघून गेले. पण, मुंबईत आल्यानंतर बाळासाहेब हयात नसतानाही रजनीकांत यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी, रजनीकांत यांच्यासमवेत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकारे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे फोटोत दिसून येत आहेत.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामुंबईबॉलिवूडरजनीकांत