३ हजार फुटांवरच सुरु झाल्या प्रसुती वेदना; केबिन क्रूने डॉक्टरांशिवाय यशस्वीरित्या महिलेची डिलिव्हरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 18:41 IST2025-07-25T18:38:36+5:302025-07-25T18:41:06+5:30

एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात एका थाई महिनेले बाळाला जन्म दिल्यानंतर हे विमान मुंबईत उतरवण्यात आलं होतं.

Thai female passenger gave birth to a baby on Air India Express Muscat Mumbai flight | ३ हजार फुटांवरच सुरु झाल्या प्रसुती वेदना; केबिन क्रूने डॉक्टरांशिवाय यशस्वीरित्या महिलेची डिलिव्हरी

३ हजार फुटांवरच सुरु झाल्या प्रसुती वेदना; केबिन क्रूने डॉक्टरांशिवाय यशस्वीरित्या महिलेची डिलिव्हरी

Air India Express: गेल्या काही दिवासांपासून अहमदाबाद येथील भीषण अपघात आणि विमानांमध्ये सुरु बिघाडाच्या समस्यांमुळे हवाई प्रवासाबाबत लोकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच एक सुखद अशी बातमी एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातून समोर आली आहे. चित्रपटातील एखाद्या सीनप्रमाणे गुरुवारी सकाळी मस्कतहून बँकॉकला जाणारं एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान काही वेळासाठी प्रसूती कक्ष झालं होतं. विमानात एका एका २९ वर्षीय थाई महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. यावेळी विमानात डॉक्टर नसताना केबिन क्रूने यशस्वीरित्या महिलेची डिलिव्हरी केली.

मस्कतहून बँकॉकला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात ३० हजार फुटांवर एका थाई महिला प्रवाशाने बाळाला जन्म दिला. विमानात डॉक्टर नव्हते, पण एअर होस्टेस आणि क्रू मेंबर्सच्या तत्परतेमुळे आणि प्रशिक्षणामुळे या महिलेने एका निरोगी बाळाला जन्म दिला. एअर इंडिया एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार ,केबिन क्रूने नीट परिस्थिती हाताळली. विमानात प्रसूतीमध्ये मदत करणाऱ्या प्रमुख केबिन क्रू सदस्यांमध्ये स्नेहा नागा, फ्लाइट अटेंडंट ऐश्वर्या शिर्के, आसिया खालिद आणि मुस्कान चौहान यांचा समावेश होता. तर कॅप्टन आशिष वाघानी आणि कॅप्टन फराज अहमद हे विमान चालवत होते. पायलटने तात्काळ मुंबईत विमान उतरवण्याची परवानगी मागितली होती. 

विमान मुंबई विमानतळावर उतरताच, वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका आधीच तिथे उपस्थित होती. त्यानंतर आई आणि नवजात बाळाला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. एअर इंडिया एक्सप्रेसची एक महिला कर्मचारी देखील त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी रुग्णालयात त्यांच्यासोबत गेली. मूळ थायलंडची राहणारी ही महिला तिच्या एक वर्षाच्या बाळासह मस्कतहून मुंबईमार्गे बँकॉक जात होती. मात्र बाळाच्या जन्मामुळे मुंबईतच तिला थांबावं लागलं. 

आता आई, नवजात बाळ आणि त्यांच्यासोबत असलेल्या एक वर्षाच्या बाळाला किमान एक आठवडा मुंबईत राहावं लागणार आहे. एअरलाइन्सच्या नियमांनुसार, नवजात बाळाला विमान प्रवास करण्यासाठी किमान वयाची पात्रता पूर्ण करावी लागते. त्यामुळे आता तिघेही आठवडाभर तरी मुंबईतच थांबणार आहेत. दुसरीकडे, नवजात बाळासाठी पासपोर्ट आणि तिघांसाठी भारतीय व्हिसा यासारख्या कागदपत्रांची प्रक्रिया सुरू झाली आहे. एअर इंडिया एक्सप्रेस मुंबईतील थाई वाणिज्य दूतावासाच्या संपर्कात आहे.
 

Web Title: Thai female passenger gave birth to a baby on Air India Express Muscat Mumbai flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.