Sanjay Raut Support Raj Thackeray Statement: तुम्ही एका खोक्याभाईचे काय घेऊन बसला आहात सर्व विधानसभा खोक्याभाईंची आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला टोला लगावला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी रवींद्र नाट्य मंदिर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मूळ विषय बाजूला राहिले आहेत आणि लोकांना बाकीच्याच विषयांमध्ये भरकटून टाकले जात आहे. संपूर्ण विधानसभेतच खोक्याभाई भरले आहेत. एका खोक्याभाईचे काय घेऊन बसलात? मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत. त्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या विधानाला पाठिंबा दर्शवला आहे.
राज ठाकरे यांनी यावेळी पक्षातील नवी पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा प्रथमच केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आणि कामे याची आखणी २ एप्रिलपर्यंत दिली जाणार आहे. काय करायचे आणि काय करायचे नाही, हे सांगितले जाईल. ज्याला जे काम दिले आहे, तेच त्याने करावे म्हणजे भांडणे कमी होतील, अशा सूचना राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या विधानावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
राज ठाकरेंचे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे
पत्रकारांनी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या विधानासंदर्भात प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना, अख्खे सभागृह खोक्याने भरलेले आहे की नाही, त्याच्याशी असहमत आहे. विधिमंडळात खोकेभाई भरले असे राज ठाकरे म्हणाले. त्यांचे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे. त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर बोट ठेवले आहे. असे खोके भाई राजकारणात असल्याने ते सहज निवडून येऊ शकतात. त्यांना विचार नाही. भूमिका नाही. नैतिकता नाही. ते सर्व खोके भाई एकत्र झाले आणि त्यांनी सरकार बनवले, अशी टीका संजय राऊतांनी केली.
दरम्यान, एखादे विधान आपले अस्तित्व दाखवण्यासाठी करणे, आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी बोलणे हे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकले आहे. विधानसभेत जे लोक काम करत आहेत, ते निवडून आले आहेत. त्या लोकांना जनतेने निवडून दिलेले आहे. ज्यांना निवडून येता येत नाही, त्यांना लोक निवडून देत नाहीत. त्यामुळे विधानसभेत न जाता ते विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात, असा पलटवार आशिष शेलार यांनी केला.