राजन साळवींचा युटर्न, वरिष्ठांवर आरोप; संजय राऊत म्हणाले, “मातोश्रीवर बोलावले आहे...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:15 IST2025-01-04T12:15:37+5:302025-01-04T12:15:59+5:30
Thackeray Group Sanjay Raut News: निष्ठावंतांच्या जोरावर शिवसेना पुन्हा गरुडझेप घेईल . पक्ष वाढवणे, सांभाळणे ही जबाबदारी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे मेहनतीने करत आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे.

राजन साळवींचा युटर्न, वरिष्ठांवर आरोप; संजय राऊत म्हणाले, “मातोश्रीवर बोलावले आहे...”
Thackeray Group Sanjay Raut News: ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख आहे. २०२४ मध्ये झालेल्या पराभावाला आम्ही सामोरे गेलो. पराभवाचे दुःख, खंत आणि वेदना माझ्यासकट मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे. पराभवाची खंत असताना भविष्याकडेही शिवसेना मार्गक्रमण करत आहे. मीडियातून मला समजले की, मी नाराज आहे. भाजपा किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण तसे काही नाही. रोजच्या कामात माझे मार्गक्रमण सुरू आहे. अशा बातम्या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार. यात कोणतीही शंका नाही, असे राजन साळवी यांनी सांगितले होते. मात्र, यानंतर काहीच तासांत युटर्न घेत विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर वरिष्ठांवर आरोप करत राजन साळवी यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
गेले काही दिवस प्रसारमाध्यमातून विविध चर्चा रंगल्या आहेत. मला पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आमच्याशी संवाद साधावा. त्यानंतर मी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यात राजन साळवी यांच्यावर अन्याय झालेला आहे असा सूर कार्यकर्त्यांचा होता. पराभवाला कारणीभूत अनेक मंडळी आहेत. तुम्ही योग्य तो निर्णय घ्या अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यावेळी मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला, असे राजन साळवी यांनी स्पष्ट केले. यावर पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
राजन साळवी यांना मातोश्रीवर बोलावले आहे
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राजन साळवी यांना मातोश्रीवर बोलावले आहे . विधानसभा निवडणुकीवेळी लांजा आणि राजापूरमध्ये उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्या सभा घेण्याचे ठरले होते. परंतु, राजन साळवी यांनी त्या नाकारल्या. राजन साळवी उद्धव ठाकरे यांना कधीही फोन करून बोलावू शकतात. राजन साळवी यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत . राजन साळवी पक्षाशी कायम प्रामाणिक राहतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच पैसा आणि सत्तेच्या जोरावर सध्याचे राजकारणी विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलवत आहेत. निष्ठावंतांच्या जोरावर शिवसेना पुन्हा गरुडझेप घेईल . पक्ष वाढवणे आणि सांभाळणे ही जबाबदारी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे मेहनतीने करतात. काही जणांना आयते कार्यकर्ते मिळून त्यांचा पक्ष वाढवला जात असेल तर त्याला काही करू शकत नाही, असा खोचक टोला खासदार विनायक राऊतांनी लगावला.
दरम्यान, माझ्या पराभवाला कारणीभूत काही वरिष्ठ मंडळी आहेत. मी त्यांचे नाव घेणार नाही. ते शोधणे गरजेचे आहे. आज जो दु:खाचा डोंगर पक्षावर, माझ्यावर वैयक्तिक माझ्या कुटुंबावर आला याला कारणीभूत कोण आहेत हे शोधणे गरजेचे आहे. जर नाही शोधले तर भविष्यात आज जी माझ्यावर वेळ आली आहे ती अन्य कुणावरही येऊ शकते. ती वेळ येऊ नये त्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने निर्णय घेतला पाहिजे. त्यासाठी मी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मी सक्षम आहे. माझ्या मतदारसंघातील अनेक मंडळी, पदाधिकारी यांनी तुम्ही योग्य निर्णय घ्या, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत असे संकेत दिले आहेत, असे राजन साळवी म्हणाले.