Join us  

मविआ बैठकीत वंचितच्या प्रस्तावावर चर्चा; संजय राऊत म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांना समाधान...”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 5:50 PM

Sanjay Raut News: महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक झाली.

Sanjay Raut News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काही पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केली आहे. तरी अद्यापही अनेक जागांवर उमेदवारांच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहेत. देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीची जागावाटपावरून वाटाघाटी सुरू असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हेदेखील सहभागी झाले होते. बैठकीत नेमके काय झाले, कोणती चर्चा झाली, काय ठरले, याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सविस्तर माहिती दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीची बैठक झाली. चार पक्षांमध्ये उत्तम चर्चा झाली. ४८ जागांवर चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. एकाही जागेवर मतभेद नाहीत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीसोबतही चर्चा झाली. त्यांनी एक प्रस्ताव दिलेला आहे, त्यावरही चर्चा झाली. आमची सर्वांची इच्छा आहे की, प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आमच्या सोबत असावी. आम्ही सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामोरे जावे हे ठरलेले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

प्रकाश आंबेडकरांना समाधान आहे की...

या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. जागावाटपाबाबत आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. कोण किती जागा लढणार याबाबतची घोषणा एकत्रच केली जाईल, स्वतंत्र घोषणा होणार नाही. प्रकाश आंबेडकरांचे एका बाबतीत पूर्ण समाधान आहे, ते म्हणजे या देशातून आणि राज्यातून मोदींची हुकूमशाही उखडून टाकायची आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, महाविकास आघाडीची पुन्हा वंचितसह बैठक होणार आहे. त्या बैठकीत अंतिम जागा कोणत्या, किती जागा द्यायच्या याचा निर्णय होईल. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास १७ जागांवरील मतदारसंघांवर चर्चा केली. आंबेडकरांनी काही जागांवर अदालबदली करावी अशी भूमिका शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी घेतली, असे काही रिपोर्ट्नुसार सांगितले जात आहे. 

टॅग्स :संजय राऊतवंचित बहुजन आघाडीमहाविकास आघाडीलोकसभा निवडणूक २०२४