“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 19:27 IST2025-07-11T19:27:25+5:302025-07-11T19:27:54+5:30
Thackeray Group Sachin Ahir News: जनसुरक्षा विधेयकाला ठाकरे गट आणि काँग्रेसने विरोध दर्शवला आहे.

“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार
Thackeray Group Sachin Ahir News: विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर झाले. या विधेयकाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविसतर भूमिकाही मांडली. परंतु, या विधेयकाला काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून विरोध करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली असून, ठाकरे गटाच्या नेत्यांनी हे विधेयक मंजूर करू नये, अशी विनंती राज्यपालांना करणार आहोत, असे म्हटले आहे.
पूर्वी, जसा मिसा कायदा होता, टाडा कायदा होता तसाच आता हा जन सुरक्षा कायदा आणण्यात आला आहे. मला असे वाटते की, याचे नाव 'जन सुरक्षे'ऐवजी 'भाजप सुरक्षा' करायला हवे. सत्ताधारी पक्षाकडे पाशवी बहुमत आहे आणि ते त्याचा उपयोग अथवा दुरुपयोग करत आहेत. याला आमचा विरोध का आहे? ते आमच्या सदस्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. यानंतर ठाकरे गटाचे विधान परिषदेतील सदस्य सचिन अहिर यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार
विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक बहुमताच्या जोरावर केलेले आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना हा विषय मांडू द्यायचा नव्हता की काय? हा प्रश्न निर्माण झाला होता. या विधेयकावर चर्चा करत असताना, बहुमताच्या जोरावर विधेयक मंजूर करून घेणार, हे आमच्या लक्षात आल्यावर त्याचा निषेध करून सभा त्याग करण्याचे काम आम्ही केले. आम्ही राज्यपालांना हे विधेयक मंजूर करू नये, अशी विनंती करणार आहोत, असे सचिन अहिर यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारच्या कथनी व करणी यामध्ये फरक दिसत आहे. ते म्हणतात की, आम्हाला नक्षलवादाचा, दहशतवादाचा बिमोड करायचा आहे. या विधेयकात कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवादाचा उल्लेख नाही. सुरुवातीला फक्त कडवी डावी विचारसरणी, कडव्या डाव्या विचारांच्या संघटनांवर कारवाई असा उल्लेख आहे. मुळात डावा-उजवा कसे ठरवणार? पूर्वी आम्ही म्हणजेच शिवसेना व भाजपा एकत्र होतो. तेव्हा आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हटले जायचे. कारण आम्ही सगळे धर्म मानणारे आहोत. परंतु, डावे-उजवे काय आहे. डावे-उजवे करण्याची गरज नाही. हे संविधानाच्या विरोधात आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.