Join us

“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 12:46 IST

Sanjay Raut News: जातनिहाय जनगणनेचा विषय राहुल गांधी यांनी उचलून धरला. म्हणून हा निर्णय झाला, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: जातनिहाय जनगणना करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. पुढील जनगणनेत ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे. या विषयाचा विरोधकांनी राजकीय हत्यार म्हणून वापर केल्याबद्दल सरकारने टीका केली. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी अशा प्रकारच्या जनगणनेची मागणी केली होती. बिहार, तेलंगणा, कर्नाटकमध्ये जातनिहाय सर्वेक्षणही झाले आहे. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या निर्णयाचे श्रेय फक्त राहुल गांधी यांचे असल्याचे म्हटले आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा सरकारने घेतला असला तरी या निर्णयाचे श्रेय फक्त राहुल गांधी यांना जाते. राहुल गांधी यांनी सातत्याने जातनिहाय जनगणनेचा विषय लावून धरला. राहुल गांधी यांनी घेतलेल्या या भूमिकेपुढे केंद्र सरकारला शेवटी गुडघे टेकावे लागले, असे स्पष्ट भाष्य संजय राऊत यांनी केले. तसेच सरकार मोदी यांचे असले तरी सिस्टिम राहुल गांधी यांची सुरू आहे. राहुल गांधी यांनी हा विषय उचलून धरल्यामुळे जातीय जनगणनेचा निर्णय झाला. बिहार, पश्चिम बंगालची निवडणूक आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. त्यावरुन समजाच लक्ष बाजूला व्हावे, म्हणून देश युद्धाच्या छायेत असताना, त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, असा दावा संजय राऊतांनी केला. 

राहुल गांधी यांचे अभिनंदन करतो

देवेंद्र फडणवीस नक्कीच राजकारणात आहेत ना, त्यांनी राजकारण सोडले का? त्यांचे आकलन, वाचन, चिंतन, गेल्या दहा वर्षांपासून राहुल गांधी सातत्याने जातीय जनगणनेची मागणी करत आहेत. यांच्या कानात बोळे भरलेत का? भाजपाची संसदेतील भाषण बघा, जातीय जनगणनेला कोणी विरोध केला? हा संसदेतला रेकॉर्ड सांगेल. हा सामाजिक न्यायाचा विषय आहे. या देशातल्या बहुजन समाजासंदर्भात हा निर्णय महत्त्वाचा आहे. सरकारने, कॅबिनेटने निर्णय घेतला. या निर्णयाचे श्रेय फक्त राहुल गांधी यांना जाते. जातीय जनगणनेचा विषय राहुल गांधी यांनी उचलला. तोपर्यंत या देशातील जनतेला माहितही नव्हते. विरोध भाजपाचा होता. कॅबिनेटच्या निर्णयाच स्वागत करतो, राहुल गांधी यांचे अभिनंदन करतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, जातीय जनगणना व्हावी अशा प्रकारची मागणी सर्व जणांची होती. मी माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो. निवडणूक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. देशात निवडणुका सुरूच असतात. कुठे ना कुठे निवडणूक होत असते. आता देशात लोकसभा निवडणुका नाहीत. पुढील लोकसभा निवडणूक यायला साडेचार वर्षे आहेत. कोणत्या ना कोणत्या राज्यात विधानसभा निवडणुका होत असतात. त्यामुळेच केंद्र सरकारने ‘वन नेशन वन इलेक्शन’ हा प्रस्ताव आणला आहे. सध्या कुठल्याही कामाला विरोधक चांगले म्हणत नाही. पूर्वी दिलदार विरोधक होते. आता चंद्रशेखर यांच्यासारखे विरोधक नाही. त्यांच्यासारखे विरोधक असते तर त्यांनी कौतुक केले असते. वाजपेयी यांनीही कौतुक केले असते. मनाचा मोठेपणा विरोधकांमध्ये नाही, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. 

 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाराहुल गांधीकाँग्रेस