Join us

कुणाल कामरा प्रकरणी राऊतांची गृहखात्यावर टीका; म्हणाले, “नुकसानीची हल्लेखोरांकडून वसुली करा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:12 IST

Sanjay Raut Reaction On Kunal Kamra Controversy: महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभल्याचे लक्षण आहे. गृहमंत्र्यांना गृहखाते चालवणे झेपत नाही, हे स्पष्ट दिसते. गृहमंत्री पद सोडावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut Reaction On Kunal Kamra Controversy: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून, या कुणाल कामरा विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कुणाल कामराने केलेल्या या टिप्पणीनंतर त्याच्या शोच्या सेटवर धडक देत शिवसैनिकांनी सेटची मोडतोड केली. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यासंदर्भात स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहखात्यावर टीका केली आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अमित शाह यांनी देशाचे पोलीस स्टेट केले आहे. म्हणजेच पोलिसांच्या दबावाखाली असलेले राज्य तयार केले आहे. परंतु, महाराष्ट्र याला अपवाद आहे. महाराष्ट्रात गुंडा राज्य आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाल कामरा याने राजकीय व्यंग, टीका टिपण्या आमच्याही केल्या आहेत. ५०-६० लोक जातात आणि स्टुडिओ फोडतात, या महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभल्याचे हे लक्षण आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री पद सोडावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

नुकसानीची हल्लेखोरांकडून वसूली करा

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृहखाते चालवणे झेपत नाही, हे स्पष्ट दिसते. आपले गृहमंत्री भाषण आणि प्रवचन देत फिरत आहेत. मग दंगलखोरांवर कारवाई करा. फडणवीस यांना स्वतःची प्रतिष्ठा सांभाळायची असेल तर दंगलखोरांवर कारवाई केली पाहिजे. ज्यांनी हा हल्ला केला, त्यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला का नाही केला? ज्याने शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या प्रशांत कोरटकरवर हल्ला करा, अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील. राजकारणातल्या लोकांनी आपल्यावरील व्यंगात्मक टीका सहन केली पाहिजे, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.

दरम्यान, एक ब्रॉडकास्टर स्टुडिओ उद्ध्वस्त केला. पोलीस झोपा काढत होते का? महाराष्ट्रात आणीबाणी लावलेली आहे का? ज्याप्रमाणे नागपूरमध्ये दंगलखोरांकडून नुकसान भरपाई भरून घेणार असल्याचे फडणवीस म्हणतात, त्याचप्रमाणे या दंगलखोऱ्यांना तुम्ही सोडणार आहात की नाही आणि त्यांचे नुकसान देणार की नाही? हा एक प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्ही गुंडाराज चालवत आहात. नुकसान झाले ते दंगलखोरांकडून वसूल करा, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :संजय राऊतकुणाल कामराएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसशिवसेना