Join us

“२०२४ ला वज्रमूठच सत्तेत असेल, हमसे जो टकराएगा मिट्टी मे मिल जाएगा”; संजय राऊतांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 20:12 IST

Vajramuth Sabha Mumbai Live: अजित पवारांचे सर्वांना आकर्षण आहे. सगळीकडे अजित पवार सभेला येणार की नाही, याचीच चर्चा सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut in Vajramuth Sabha Mumbai: छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि यानंतर मुंबईतमहाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या सभेला तीनही पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. या सभेत बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपला थेट इशारा दिला. २०२४ ला वज्रमूठच सत्तेत असेल, हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जाएगा, असा एल्गार संजय राऊत यांनी केला. 

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा हा महाराष्ट्र देशा, असा आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र दिनी याच महाराष्ट्राला प्रणाम करण्यासाठी वज्रमूठ सभा घेतली आहे. ही वज्रमूठ सभा प्रचंड आहे. मैदानात जेवढी गर्दी दिसतेय, त्यापेक्षा दुप्पट, तिप्पट गर्दी मैदानाबाहेर आहे. बीकेसीतील छोट्या मैदानावर वज्रमूठ सभा घेतात, असे सांगत भाजप नेत्यांनी या सभेची खिल्ली उडवली होती. त्यांना सांगतो की, येऊन पाहा म्हणजे सभा किती प्रचंड होती ते तुम्हाला कळेल. तुमचे डोळे चीनी आहे, बारीक डोळ्यांमुळे तुम्हाला दिसत नसेल, असा खोचक टोला संजय राऊतांनी यावेळी बोलताना लगावला.

वज्रमूठ सभेत अजित पवार यांचेच आकर्षण, त्यांचीच जास्त चर्चा

कोणीही काहीही म्हटले तरी हम सब एक हैं, एकही रहेंगे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच अजित पवार यांच्या उपस्थितीवरून सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना, सध्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचेच आकर्षण सर्वांना आहे. सगळीकडे अजित पवार सभेला येणार की नाही, याचीच चर्चा सुरू आहे, अजित पवार आले आहेत, अशी मिश्किल टिप्पणी संजय राऊत यांनी यावेळी केली. तसेच १०० व्या मन की बात कार्यक्रमावरून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली. 

९ वर्ष फक्त मन की बात करतायत, काम की बात करत नाही

सगळीकडे आपले मन की बात सुरू आहे. माधुरी दीक्षित मन की बात ऐकतेय. अॅक्टर आणि त्यांच्यासोबत काही कॅरेक्टर मन की बात ऐकत होते. ९ वर्ष फक्त मन की बात करतायत, काम की बात करत नाही, जनतेची बात करत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी शिवसेनेवर घाव घातले गेले. कारण शिवसेनेवर घाव घातल्याशिवाय मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही, हे दिल्लीकरांना चांगले माहिती आहे. मात्र, आता शिवसेना एकटी नाही. शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, विरोधात बोलले की आतमध्ये टाकतात. आम्ही जाऊन आलो आहोत, त्यामुळे आता आम्ही कुणाला घाबरत नाही. चोर, लफंगे, दरोडेखोर, बँका लुटणारे तुमच्या वॉशिंग मशीनध्ये टाकाचये आणि स्वच्छ करून घ्यायचे, हेच सुरू आहे. मात्र, संपूर्ण राज्यात मविआची वज्रमूठ घट्ट आहे. आणि २०२४ ला हीच वज्रमूठ सत्तेत असेल.  हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जाएगा, असा इशारा संजय राऊतांनी दिला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :संजय राऊतमहाविकास आघाडीमुंबई