“औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच राहू द्या”; अरविंद सावंतांनी मांडली भूमिका, कारणही सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:20 IST2025-03-17T11:16:50+5:302025-03-17T11:20:43+5:30

Thackeray Group MP Arvind Sawant: औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आलेला नाही, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

thackeray group mp arvind sawant said let aurangzeb tomb remain in maharashtra | “औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच राहू द्या”; अरविंद सावंतांनी मांडली भूमिका, कारणही सांगितले

“औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच राहू द्या”; अरविंद सावंतांनी मांडली भूमिका, कारणही सांगितले

Thackeray Group MP Arvind Sawant: एकीकडे बीड, परभणी, लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, महागाई यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असतानाच आता दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच राहू द्यावी, असे म्हटले आहे. 

महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने दिला आहे. औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी भूमिका मांडत त्यामागचे कारणही सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच राहू द्या

औरंगजेबाचे थडगे लोकांना दिसले पाहिजे. औरंगजेबाला इथेच गाडले आहे, हा इतिहास आहे, तो तसाच राहिला पाहिजे, या मताचा मी आहे. पक्षाची भूमिका मांडत नाही. अन्यथा लोकांना इतिहास कसा कळणार. औरंगजेबाला इथे जिंकता आलेले नाही. औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आलेला नाही. ताराराणी आणि इतर शिवरायांच्या मावळ्यांचा तो इतिहास आहे. कबर हटवून कुणाच्या घरची चूल पेटणार आहे का? असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, अबु आझमींचे वक्तव्य हे नेमके अधिवेशनाच्याच काळात कसे येत?, त्यांचा बोलविता धनी कोण? राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत, त्या मुद्यांकडे अधिक गांभीर्याने बघायला हवे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. 

 

Web Title: thackeray group mp arvind sawant said let aurangzeb tomb remain in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.