Uddhav Thackeray Live: “शिवसेना म्हणजे नाव किंवा चिन्ह नाही, मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरी...”; उद्धव ठाकरेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 21:03 IST2023-02-27T21:03:24+5:302023-02-27T21:03:57+5:30
Uddhav Thackeray Live: आई-वडिलांनी दिलेले संस्कार झाले नाहीत की दुसऱ्याची गोष्ट चोरण्याची वेळ येते, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Uddhav Thackeray Live: “शिवसेना म्हणजे नाव किंवा चिन्ह नाही, मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरी...”; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Live: मला कधीही चिंता नव्हती आपले काय होणार कारण बाकी काही चोरता येते, चोरीला जाऊ शकते. मात्र, संस्कार चोरता येत नाहीत. आणि ज्यांच्यावर संस्कार नसतात त्यांनाच चोरीचा माल लागतो. शिवसेना म्हणजे केवळ नाव आणि चिन्ह नाही, ती हजारोंच्या मनात भिनलेली आहे. मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरी भिनलेली शिवसेना काढू शकणार नाही, या शब्दांत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
मराठी राजभाषा दिनानिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. नाव, पक्ष चोरला तरी ठाकरे कसे चोरणार, असा सवाल करत,गद्दारीचा शिक्का यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या कपाळावर उमटवला आहे. ठाकरे म्हणजे मी एकटा नाही, तर शिवसैनिकांचे पूर्ण कुटुंब आहे. कितीही संकटे आली तरी त्यात संधी शोधणारा मी आहे, असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले.
नाव, धनुष्यबाण चोरलेले घेऊन मैदानात या, मी मशाल घेऊन येतो
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची स्थापना केली. तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. अनेक जण त्या क्षणाचे साक्षीदार आहेत. मी खोटे बोलत नाही, हे अनेक जण सांगतील. आताच्या घडीला जी शिवसेना दिसत आहे, त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला आहे. आताच्या पिढ्यांना अनेक गोष्टी सांगूनही समजणार नाही. बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हातात आत्मविश्वासाची एक तलवार दिली. ती म्हणजे शिवसेना. बाळासाहेबांनी कधीही कुणासमोर गुडघे टेका, पालख्या वाहा, असे शिकवलेले नाही. जगाल तर आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने जगा, असेच सांगितले आहे, अशा आठवणी उद्धव ठाकरेंनी यावेळी जागवल्या. तसेच नाव आणि धनुष्यबाण चोरलेल्यांनी मैदानात यावे. मी मशाल घेऊन येतो, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिले.
दरम्यान, आई-वडिलांनी दिलेले संस्कार झाले नाहीत की दुसऱ्याची गोष्ट चोरण्याची वेळ येते, ती त्यांच्यावर आली. आपले शत्रू कोण हे सर्वांना माहिती आहे. दूध का दूध और पानी का पानी आम्ही करणार. केवळ एवढेच नाही, तर तुमचे गोमूत्र कसे आहे, तेही आम्ही दाखवणार आहोत, असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"