“BMC-BEST कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देणार आहे की नाही?”; आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 15:25 IST2023-11-08T15:24:13+5:302023-11-08T15:25:00+5:30
Aaditya Thackeray: अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच बीएमसी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस अद्याप मिळालेला नाही, असे सांगत आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे.

“BMC-BEST कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देणार आहे की नाही?”; आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल
Aaditya Thackeray: दिवाळी काही तासांवर येऊन ठेपली आहे. मुंबई महापालिका आणि ‘बेस्ट’चे कर्मचारी अद्याप बोनसची वाट पाहत आहेत. यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. BMC-BEST कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देणार आहे की नाही, असा थेट सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदा बीएमसी आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नाही. तसेच बोनस मिळणार की नाही? याबाबतही संभ्रम आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. याबाबत एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.
BMC-BEST कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देणार आहे की नाही?
आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, BMC महापालिका आयुक्तांना एक महत्त्वाचा प्रश्न, अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच BMC आणि BEST च्या कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळी बोनस अद्याप मिळालेला नाही. सीएमओच्या माध्यमातून बीएमसी चालवणारे खोके सरकार (लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत) दिवाळी बोनस देणार आहे की नाही? देणार असेल, तर कधी? दिवाळी संपल्यावर?? अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, असो, जनतेच्या माहितीसाठी आणखी एक विषय, रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदाराला बडतर्फ करण्याची फाइल अंतिम स्वाक्षरीसाठी महापालिका आयुक्तांच्या डेस्कवर पोहोचली आहे. ते त्यावर स्वाक्षरी करून त्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करणार की खोके सरकारच्या दबावापुढे झुकून त्यांच्याबरोबरीने मुंबई लुटणार? पुढील 24 तासांत यापैकी काय होते ते पाहू, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.