Join us

ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 07:11 IST

कुठलीही अघोरी शक्ती मराठी माणसाची वज्रमूठ तोडू शकत नाही

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही चुकीचे बोलले नाहीत. महापालिका निवडणुका एकत्रित लढविण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे. कुठलीही अघोरी शक्ती मराठी माणसाची वज्रमूठ तोडू शकत नाही. ठाकरे बंधू एकत्र मिळून निवडणूक लढवून मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याणसह अनेक महापालिकांवर सत्ता स्थापन करतील, असा दावा ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी शुक्रवारी केला.

देश स्वतंत्र होऊन ७९ वर्षे झाली आहेत. या वर्षात देशाला प्रगतिपथावर नेण्याचे श्रेय नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना जाते. प्रत्येक पंतप्रधानांनी यात काही ना काही योगदान दिले आहे. मात्र आपला धार्मिक देश धर्माध केला इतकेच भाजपचे दहा वर्षातले योगदान आहे. ते जातीय धार्मिक फूट पाडत असून देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते धोकादायक आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला. त्यांनी त्याची सुरुवात स्वतःपासून करावी. स्वदेशीचा नारा काँग्रेस, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक व पंडित नेहरू यांनी दिला म्हणून देशात खादी आली. कदाचित एखाद्या दिवशी ते गांधी टोपी घालून भाषण करतील. आज ते काँग्रेसवाले, नेहरूवादी आणि गांधीवादी झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :संजय राऊतउद्धव ठाकरेराज ठाकरे