बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 10:53 IST2026-01-01T10:52:44+5:302026-01-01T10:53:21+5:30
...तर, बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
मुंबई : ठाकरे बंधूंची युती झाली असली तरी काही प्रभागात बंडखोरी उफाळून आली. नाराजी शमविण्यासाठी उद्धवसेना व मनसेचे नेते त्यांची समजूत घालणार आहेत. तर, बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसेने १०६ प्रभागातून सत्यवान दळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात उद्धवसेनेचे सागर देवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, ११४ प्रभागातून मनसेच्या अनिशा माजगावकर यांनी उद्धवसेनेच्या राजोल पाटील यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज ठाकरे यांनी समजूत काढूनही त्यांनी अर्ज भरल्याने आता त्यांची मनसे नेत्यांकडून मनधरणी करण्यात येणार आहे.
उद्धवसेनेचे माजी नगसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांनी प्रभाग क्र. ९५ मधून पक्षाचेच अधिकृत उमेदवार हरी शास्त्री यांच्याविरोधात बंड केले आहे. खा. संजय राऊत यांनी उमेदवारी देणाऱ्या मंडळाने एकमताने मेरिटवर शास्त्रींना उमेदवारी दिली आहे. वायंगणकर आधीही नगरसेवक होते. त्यामुळे इतरांना संधी मिळू द्या, ती सुरुवात स्वत:पासून करा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.