‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 06:22 IST2025-07-02T06:21:25+5:302025-07-02T06:22:01+5:30

मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे उद्धव ठाकरे हे २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर दिसतील.

'Thackeray Brand' to show strength at rally on Saturday; Raj-Uddhav on same platform at Worli Dome | ‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर

‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर

मुंबई : सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धवसेनेच्या विजयी मेळाव्याचे ठिकाण आणि वेळ अखेर निश्चित झाली आहे. शनिवार, ५ जुलै रोजी वरळीच्या एनएससीआय डोम येथे सकाळी १० वाजता हा मेळावा होणार आहे.

मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे उद्धव ठाकरे हे २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर दिसतील. त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याकडे ‘ठाकरे ब्रँड’चे शक्तिप्रदर्शन म्हणूनही पाहिले जात आहे.

पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरुद्ध मनसे आणि उद्धवसेनेने भूमिका घेतल्यानंतर सरकारला याबाबतचे दोन शासन निर्णय मागे घ्यावे लागले. हा विजय राजकीय पक्षांचा नसून मराठी जनतेचा असल्याचे राज आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले असले तरी महापालिका निवडणुकीत हा विषय ‘एनकॅश’ करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी होऊ शकतात, अशी चर्चा आहे. दोन्ही ठाकरे हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र आले असले तरी महापालिका निवडणुकीत ते एकत्र दिसतील का? याबाबत उत्सुकता कायम आहे.

आपले नम्र राज ठाकरे-उद्धव ठाकरे!

मनसेचे संदीप देशपांडे यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट टाकली आहे. ‘आवाज मराठीचा! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं...! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत. बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजतगाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या!! आम्ही वाट बघतोय...! आपले नम्र राज ठाकरे-उद्धव ठाकरे.’ या पोस्टद्वारे मेळाव्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे.

आयोजनाची जबाबदारी...

मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी मनसेकडून ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर, मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि माजी आ. नितीन सरदेसाई तर उद्धव सेनेकडून खा. संजय राऊत, आ. वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्यावर सोपवण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. हा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. मात्र सरकार परवानगी देणार नाही, त्यामुळे अखेर राज यांनी वरळी डोमचा पर्याय दिला, अशी माहिती खा. राऊत यांनी दिली.

Web Title: 'Thackeray Brand' to show strength at rally on Saturday; Raj-Uddhav on same platform at Worli Dome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.