Join us  

कोरोनामुक्त गावांमध्ये १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 6:56 AM

शिक्षण विभागाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

मुंबई : काही महिन्यांपासून कोरोनामुक्त झालेली व भविष्यातही कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावांमध्ये इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करता येतील का, याची चाचपणी शालेय शिक्षण विभागाने करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी एका बैठकीत दिले.

शिक्षण विभागाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोनामुक्त असलेले व भविष्यातही कोरोनामुक्त राहू अशी केवळ ग्वाही देणारी नव्हे तर त्यानुसार कृती करणाऱ्या गावांचा या बाबत विचार करावा, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्याकंन करताना सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या १२ वीच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने १० वी साठी मूल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली, त्याचा तुलनात्मक अभ्यास करावा. त्यानुसार अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याची योजना प्रस्तावित करण्यात येत आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 

हिवरे बाजार पॅटर्न

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांच्या नेतृत्वात हिवरे बाजार (जि. अहमदनगर) येथे शाळा सुरू झाली आहे. गाव कोरोनामुक्त असल्याने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने हे शक्य झाले. त्या धर्तीवर राज्यात आता चाचपणी केली जाईल.

राज्यातील सर्व शाळा सुरू करा : पोपटराव पवार

कोरोना नियमांची योग्यरीत्या अंमलबजावणी करत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय  सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी हिवरे बाजारचे  सरपंच पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :शाळाउद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस