कांदिवलीत हेलिपॅडची चाचपणी सुरू, कोस्टल रोडलगत पालिकेची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 14:36 IST2026-04-13T14:35:13+5:302026-04-13T14:36:24+5:30
Mumbai News: मुंबई महापालिका कोस्टल रोड उत्तर प्रकल्पाच्या अनुषंगाने कांदिवलीतील चारकोप येथे दुसरे हेलिपॅड उभारण्याच्या विचारात आहे. दक्षिण मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पासाठी वरळी येथे उभारलेल्या हेलिपॅडच्या धर्तीवर हा नवा प्रकल्प विकसित केला जाणार आहे.

कांदिवलीत हेलिपॅडची चाचपणी सुरू, कोस्टल रोडलगत पालिकेची सुविधा
मुंबई - मुंबई महापालिका कोस्टल रोड उत्तर प्रकल्पाच्या अनुषंगाने कांदिवलीतील चारकोप येथे दुसरे हेलिपॅड उभारण्याच्या विचारात आहे. दक्षिण मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पासाठी वरळी येथे उभारलेल्या हेलिपॅडच्या धर्तीवर हा नवा प्रकल्प विकसित केला जाणार असून, तो सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर राबविण्यात येणार आहे.
प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारकोप परिसरात सध्या सुरू असलेल्या बोगदा बांधकामासाठी वापरली जात असलेली जागा पुढील टप्प्यात हेलिपॅडसाठी वापरण्यात येणार आहे. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ही जागा पुनर्वापर करून हेलिपॅड उभारले जाईल. सुमारे ५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ या प्रकल्पासाठी आवश्यक असून, ते उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कांदिवलीतील चारकोप येथील प्रस्तावित हेलिपॅड हा मुंबईतील दुसरा हेलिपॅड ठरणार आहे. चारकोप ते मालाडच्या माइंडस्पेसला जोडणाऱ्या नियोजित बोगद्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर तो उभारणीला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान हेलिपॅडसाठी अंतिम जागा निश्चित करण्यापूर्वी विविध तांत्रिक बाबींची तपासणी केली जाणार आहे. विशेषतः परिसरात उच्च-दाब वीजवाहिन्या (हाय-टेंशन वायर) आहेत का, उड्डाणासाठी आवश्यक सुरक्षितता निकष पूर्ण होतात का, याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.
एअर ॲम्ब्युलन्ससाठी वरदान ठरणार ?
महापालिका प्रशासन या हेलिपॅडचा वापर केवळ वाहतूक सेवांसाठीच नव्हे, तर आपत्कालीन सेवांसाठी करण्याचा गंभीरपणे विचार करत आहे.
एअर ॲम्ब्युलन्ससारख्या सेवांमुळे उपनगरांतील रुग्णांना अल्पावधीत प्रमुख रुग्णालयांमध्ये हलविणे शक्य होईल. त्यामुळे गंभीर रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
मुंबईकरांना मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी देण्यात येणार
कोस्टल रोडच्या मरिन ड्राइव्ह ते वांद्रेपर्यंतच्या
वेगवान प्रवासानंतर याला हवाई वाहतुकीची जोड देत मुंबईकरांना मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे.
यासाठी वरळी येथे हेलिपॅड उभारण्यात येत असून या प्रकल्पासाठी खासगी भागीदार म्हणून रेमंड लि.ची निवड करण्यात आली आहे.
मुंबई ते मीरा-भाईंदर, ठाणेशी वेगवान जोडणी
कोस्टल रोड उत्तर प्रकल्प वर्सोवा ते
भाईंदरपर्यंत पसरलेला असून, या मार्गामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरांना दक्षिण मुंबई, तसेच ठाणे आणि मीरा-भाईंदरशी वेगवान जोडणी मिळणार आहे. प्रकल्पात बोगदे, पूल व खाडी भागातील जटिल कामांचा समावेश आहे.
पालिकेला ५० टक्के हिस्सा मिळणार
करारानुसार, हेलिकॉप्टर लँडिंग फीमधील ५० टक्के हिस्सा बीएमसीला मिळणार आहे. दरमहा किमान २४ लाख रुपयांची हमी रक्कम देण्याची अट ठेवण्यात आली असून, या दोन्हींपैकी जास्त रक्कम पालिकेला मिळणार आहे. प्राथमिक नियोजनानुसार, आवश्यक तांत्रिक आणि वैधानिक परवानग्या पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीत हे हेलिपॅड कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.