Tension on the outpatient departments of government hospitals due to a private doctor's strike | खासगी डॉक्टरांच्या संपामुळे शासकीय रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागावर ताण
खासगी डॉक्टरांच्या संपामुळे शासकीय रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागावर ताण

मुंबई : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सोमवारी देशभरात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद होते. शिवाय, रेडिओलॉजिस्ट संघटनांनी या बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.

निवासी डॉक्टरांच्या मार्ड आणि इंटर्न डॉक्टरांच्या अस्मि या संघटनांनीही काळ्या फिती बांधून आंदोलनात सहभाग घेतला. परिणामी, या बंदमुळे खासगी रुग्णालयातील रुग्णांचा ओढा शासकीय आणि पालिका रुग्णालयांत वळल्याचे दिसून आले. या सर्व संघटनांनी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा लागू करण्याची प्रमुख मागणी केली आहे.

मुंबईसह राज्यभरातील खासगी रेडिओलॉजिस्टनी वैद्यकीय प्रयोगशाळा बंद ठेवल्यामुळे सोनोग्राफी, एक्स रे, सीटी स्कॅन आणि एमआरआय या अत्यंत महत्त्वाच्या वैद्यकीय सेवा सोमवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे असंख्य रुग्णांची गैरसोय झाली. यापैकी बºयाच रुग्णांनी शासकीय रुग्णालय आणि मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील प्रयोगशाळांमध्ये धाव घेऊन वैद्यकीय अहवाल मिळविले. काम बंद आंदोलनामुळे शासकीय व पालिका रुग्णालयांतील बाह्य रुग्णांत २० टक्के अधिक रुग्णांची गर्दी दिसून आली. असोसिएशन आॅफ मेडिकल कन्सलटंट, द ट्रेनड् नर्सेस असोसिएशन आॅफ इंडिया या संघटनांनीही काम बंद आंदोलनात सहभाग घेतला होता.

इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमॅजिंग असोसिएशन (महाराष्ट्र राज्य शाखा)चे सचिव समीर गांधी यांनी सांगितले की, काही प्रयोगशाळांमध्ये फक्त आपत्कालीन सेवा सुरू ठेवल्याने रुग्णांना माघारी फिरावे लागले नाही. मात्र अशा प्रयोगशाळांची संख्या जास्त नव्हती. केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, सोमवारी सकाळपासून बाह्यरुग्ण विभागात येणाºया रुग्णांची संख्या अधिक होती, तसेच वैद्यकीय चाचण्यांसाठीही बरेच रुग्ण पालिका रुग्णालयांमध्ये आल्याचे दिसून आले.

...त्यानंतर ठरणार पुढची भूमिका
मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यानंतर पश्चिम बंगाल येथे या हल्ल्याप्रकरणी जो निर्णय घेण्यात येईल, त्यानंतरच राज्यातील संघटना पुढची भूमिका जाहीर करतील.
- डॉ. नीलिमा वैद्य-भामरे, सचिव, असोसिएशन आॅफ मेडिकल कन्सलटंट
खासगी रुग्णालयांतील सेवा बंद असल्याने सोमवारी बाह्यरुग्ण विभागांत अधिक गर्दी झाली. यामुळे विभागाची वेळ वाढली. मात्र, सर्व रुग्णांवर औषधोपचार केले.
- डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय

कृतिशील धोरण राबवा
देशभरातील रुग्णालयांत एकसारखी सुरक्षा व्यवस्था लागू करावी. वॉर्डमध्ये प्रवेशासाठी एसओपी (स्टँडर्ड आॅपरेशन प्रोसिजर) बनविले जावे. रुग्णालयांत सुरक्षा गार्डची संख्या वाढवून बंदूकधारी गार्ड तैनात करावे. वैद्यकीय विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवावी. सीसीटीव्ही बसवावेत. रुग्णालयांत सुरक्षेसाठी हॉटलाइन अलार्म सिस्टम बसवावी. सुरक्षेची नियमित तपासणी करावी, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत.
- डॉ. सुहास पिंगळे, सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन, राज्य


Web Title: Tension on the outpatient departments of government hospitals due to a private doctor's strike
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.