मुंबई - गुढीपाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याचा उल्लेख करत गंगा नदीच्या अस्वच्छेतेवर भाष्य केले. राज यांनी गंगा नदीच्या अस्वच्छतेचा व्हिडिओ सभेत लावला. त्यानंतर दादर येथील शिंदेसेनेचे समाधान सरवणकर यांनी शिवसेना भवनासमोर बॅनर लावून राज ठाकरेंना डिवचलं आहे. गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय..असा सवाल समाधान सरवणकरांनी बॅनरवरून विचारला आहे. त्यावर मनसे आक्रमक झाली आहे.
सकाळपासून सरवणकरांच्या बॅनरची चर्चा होऊ लागल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. हा बॅनर तातडीने काढावा अन्यथा मनसे स्टाईलने बॅनर काढू असं सांगत इशारा दिला आहे. मनसेच्या आक्रमक पावित्र्यानंतर महापालिकेने तात्काळ हा बॅनर तिथून हटवला आहे. मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहून पोलीसही तिथे दाखल झाले. यावेळी मनसेचे स्थानिक नेते म्हणाले की, परिसरातील बाकीचे बॅनर जसे पालिकेकडून काढण्यात येत होते तसा हा बॅनरही काढला जावा. सत्तेत असल्याने महापालिका अधिकारी बॅनर काढायला घाबरत असेल पण आम्ही कुणाला घाबरत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. समाधान सरवणकर ही बालिशबुद्धी आहे. तो असेच स्टंट करत असतो. दादर माहिमकर या बालिशबुद्धीतून वाचले आहेत असा टोला समाधान सरवणकरांना लगावला.
तर अनेक वर्षानंतर हिंदू एकजूट झाली आहे पण हिंदू एकजूट झाल्यावर त्यांना सॉफ्ट टार्गेट केले जाते. गंगा शुद्ध झाली पाहिजे हे ठीक आहे पण श्रद्धेचा ज्यावेळी विषय येतो, हिंदूचा विषय येतो. ६० कोटी हिंदू एका जागेवर येतात तेव्हा हिंदूबद्दल अपप्रचार करतो हे योग्य नाही. निवडणुकीत हिंदू नेता म्हणून प्रोजेक्ट करायचे आणि हिंदूनाच टार्गेट करायचे हे कितपत योग्य आहे..? हे खूप हुशार नेते आहेत. हिंदूबद्दल वारंवार गोष्टी घडत आहेत. ज्यावेळी हिंदू एकजूट होतो तेव्हा ही एकजूटता अशीच राहिली पाहिजे असं समाधान सरवणकर यांनी म्हटलं.
दरम्यान, प्रत्येक निवडणुकीत आपण आपली भूमिका बदलत राहिली. एकदा हिंदू, एकदा मराठी, पुन्हा हिंदू अशा भूमिका बदलत राहतात. जनताही हुशार आहे. उत्तर भारतीयांना मारहाण करायची. त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावायची. तुमचे मित्र गुजराती, जैन आहेत. दरवेळी भूमिका बदलायची. मराठी मतदार हा खुप हुशार झालाय. हिंदू म्हणून यांना कुणी प्रोजेक्ट करत असेल तर हिंदूंनी त्यांना विधानसभेत नाकारले आहे. दरवेळी भूमिका बदलली तर आम्ही तुम्हाला नाकारू हे जनतेने दाखवून दिले आहे अशी खोचक टीकाही समाधान सरवणकर यांनी राज ठाकरेंवर केली.