कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 10:09 IST2025-08-07T10:08:10+5:302025-08-07T10:09:06+5:30
हे आंदोलन दीड ते दोन तास सुरू होते. यामुळे काही वेळ कामावर जाणाऱ्यांची खोळंबा झाला.

कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
मुंबई : गेले काही दिवस सुरू असलेला मुंबईतीलकबुतरखान्याचा वाद बुधवारी सकाळी आणखी पेटला. महापालिकेने प्लास्टिक कापड टाकून बंद केलेला दादर येथील कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याचा जैन समाजबांधवांनी सकाळी प्रयत्न केला. पोलिसांच्या उपस्थितीतच त्यांनी छप्पर काढले. यावेळी आंदोलक आणि पोलिस आमने-सामने आले होते. हे आंदोलन दीड ते दोन तास सुरू होते. यामुळे काही वेळ कामावर जाणाऱ्यांची खोळंबा झाला.
सकाळी जैन मंदिरात भाविक प्रार्थनेसाठी आले होते. त्यानंतर ९:४५ वाजेच्या सुमारास थोडा वेळ शांततेत आंदोलन करून निघण्याच्या तयारीत असताना अचानक लाेक आक्रमक झाले, असे एका आंदोलकाने सांगितले. त्यांनी कबुतरखान्याचा ताबा घेतला. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
दरम्यान कबुतरांचे ज्यांना एवढेच प्रेम असेल तर त्यांनी पाच-पाच कबूतरे आपल्या घरी सांभाळायला घेऊन जावी, अशी संतप्त प्रतिक्रिया संतोष परब या रहिवाशांने दिली.
आंदोलकांची घोषणाबाजी
काही आंदोलक जियो और जिने दो, जय श्री रामच्या घोषणा देत होते. महिला आंदोलक कबुतरखान्याच्या आत जात त्यांनी दोरीने बांधलेले बांबू सोडून प्लास्टिक कापड बाजूला सारले. त्यानंतर काही पक्षी आत जाऊ लागले. जवळपास अर्धा कबुतरखाना खुला झाल्यानंतर काही आंदोलनकर्त्यांनी धान्य आणून कबुतरखान्यात रिकामे केले. तर महिलांनीही ते इतरत्र पसरून कबुतरांची सोय केली.
दोऱ्या कापल्या
आंदोलक महिलांनी कबुतरखान्यात प्रवेश केला आणि बांबूने बांधलेले छप्पर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोऱ्यांच्या गाठी सोडण्यात बराच वेळ जात असल्याने दोऱ्या कापण्यासाठी एका महिलेने काही सुऱ्या आणल्या आणि आतील महिलांना दिल्या.
न्यायालयाच्या आदेशापर्यंत कबुतरखाने बंदच
उच्च न्यायालयाच्या पुढील निर्देशापर्यंत कबुतरखान्यावरील ताडपत्री काढली जाणार नसून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू, अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली. त्यामुळे न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत कबुतरखाने बंदच ठेवण्यात येणार आहेत, असे पालिकेकडून सांगण्यात आले.