विदर्भातील ३ महामार्गांच्या निविदा भूसंपादनाअभावी रद्द करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:14 IST2025-10-16T09:14:23+5:302025-10-16T09:14:31+5:30
नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते गोंदिया, भंडारा ते गडचिरोलीसाठी पुन्हा प्रक्रिया

विदर्भातील ३ महामार्गांच्या निविदा भूसंपादनाअभावी रद्द करणार
- अमर शैला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या वर्षी काढलेल्या आणखी तीन महामार्ग प्रकल्पांच्या कामाच्या निविदा रद्द केल्या जाणार आहेत. यामध्ये नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते गोंदिया आणि भंडारा ते गडचिरोली या तीन महामार्गांचा समावेश आहे. या प्रकल्पांचे भूसंपादन अद्याप झाले नसल्याने निविदा रद्द करून त्या नव्याने मागविण्यात येणार आहेत.
समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीपर्यंत करण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे. त्यानुसार नागपूरपासून ते चंद्रपूरपर्यंत समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार महामार्गाची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पांसाठी एमएसआरडीसीने गेल्यावर्षी निविदा काढल्या होत्या. त्यातील नागपूर-चंद्रपूर महामार्गाच्या आर्थिक निविदा या वर्षी जानेवारीमध्ये खुल्या केल्या होत्या. त्यातील नागपूर ते चंद्रपूर प्रकल्पाच्या निविदा २७ टक्के अधिक दराने, तर नागपूर- गोंदिया प्रकल्पाच्या निविदा ४० टक्क्यांहून अधिक दराने आल्या. त्यात या निविदा अधिक दराने आल्याने त्यावर टीकाही झाली होती.
दरम्यान, नागपूर-गोंदिया आणि भंडारा-गडचिरोली या महामार्गांच्या संयुक्त मोजणीचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता भूसंपादन करून प्रकल्पाचे काम सुरू करणे शक्य होणार आहे. भूसंपादनाचा खर्च कर्ज काढून भागवला जाणार आहे. मात्र कर्जाचा तिढा असल्याने, तसेच भूसंपादन रखडल्याने या प्रकल्पाच्या निविदा खुल्या होऊनही काम सुरू होऊ शकले नव्हते. परिणामी या प्रकल्पाच्या कामासाठी कंपन्यांना देकारपत्र देण्यात आले नव्हते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
४ हजार कोटींचे कर्ज मंजूर
आता या तिन्ही प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपये लागणार आहेत. या कर्जाला हुडकोने मंजुरी दिली आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागपूर ते चंद्रपूर मार्गात बदल
नागपूर ते चंद्रपूर महामार्गाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. चंद्रपूरमधील व्याघ्र प्रकल्पाचे प्रभाव क्षेत्र, तसेच कोलफिल्ड प्रकल्पामुळे या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.