शिडी खरेदीची निविदा ‘अग्निशमन’कडून स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 08:09 IST2025-05-24T08:09:11+5:302025-05-24T08:09:11+5:30
चार मीटरसाठी दुप्पट रकमेत शिडी खरेदीची ही निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

शिडी खरेदीची निविदा ‘अग्निशमन’कडून स्थगित
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ८० कोटी रुपये किमतीच्या शिडी खरेदी करण्याच्या वादग्रस्त निविदेला मुंबई अग्निशमन दलाने अखेर स्थगिती दिली आहे. अग्निशमन दलाने यापूर्वी २१ व्या मजल्यापर्यंत जाणारी टर्न टेबल शिडी १० कोटी रुपयांत विकत घेतली होती, तर त्यापेक्षा केवळ ४ मीटर उंच, म्हणजेच २२ व्या मजल्यापर्यंत पोहोचणाऱ्या चार शिड्यांसाठी एकूण ८० कोटी खर्च करण्याची तयारी केली होती. चार मीटरसाठी दुप्पट रकमेत शिडी खरेदीची ही निविदा त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
भाजपचे प्रवक्ते व माजी गटनेते भालचंद्र शिरसाट यांनी याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी म्हटले की, यापूर्वी ६४ मीटरची एक शिडी १० कोटी रुपयांत खरेदी झाली. त्या निविदा प्रक्रियेत तीन कंपन्यांनी भाग घेतला. आता फेब्रुवारीत ६८ मीटर उंच शिडी खरेदीसाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात आली आहे. त्यात ४ मीटर अधिक उंच शिडीसाठी दुप्पट पैसे मोजण्याची तयारी होती.
उंच जाण्याची व्यवस्था आहे
सध्या अग्निशमन दलात ६४ मीटर उंचीचे टर्न टेबल शिडी उपलब्ध आहे. तसेच २१ मजल्यांपेक्षा अधिक उंच इमारतीत पोहोचण्यासाठी ७० मीटर, ८१ मीटर आणि ९० मीटर उंच हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म बसवलेली वाहने आहेत. तरीही त्यांनी ६८ मीटर उंचीच्या चार शिड्या खरेदीसाठी निविदा राबविली आहे, असे शिरसाट यांनी सांगितले.
एकाच कंपनीची मक्तेदारी
एवढ्या उंच शिडीचे उत्पादन करणारी जगात मॅग्रियस जीएमबीएच ही एकमेव कंपनी असून, तिची जगभरात मक्तेदारी आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेत स्पर्धाच झाली नाही आणि त्याचा फायदा घेत कंपनीने दुप्पट किंमत लावली, असा आरोप शिरसाट यांनी केला आहे.
६८ मीटर उंचीची शिडी खरेदी करण्याची निविदा आता थांबवण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत मी अधिक भाष्य करू शकत नाही. - राजेंद्र अंबुलगेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी.