सिमेंट-काँक्रीटचे रस्ते, उत्तुंग इमारतींच्या बांधकामांमुळे तापमानात होतेय वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 12:10 IST2026-03-29T12:10:12+5:302026-03-29T12:10:33+5:30
दरवर्षी नवनवीन उच्चांकाची नोंद; 'अर्बन हीट आयर्लंड'च्या परिणामामुळे मुंबईकरांना उष्याच्या झळा

सिमेंट-काँक्रीटचे रस्ते, उत्तुंग इमारतींच्या बांधकामांमुळे तापमानात होतेय वाढ
मुंबई : ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढीची समस्या भेडसावत असतानाच मुंबईत सुरू असलेली उत्तुंग इमारतीची शेकडो बांधकामे, हजारो किलोमीटरचे सिमेंट काँक्रिटचे रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे आर्दीमुळे शहराच्या तापमानाचे नवनवीन उच्चांक नोंदविले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून रस्तेही डांबराऐवजी सिमेंट काँक्रिटचेच तयार केले जात आहेत. डांबराच्या तुलनेत सिमेंटचे रस्ते उष्णता अधिक काळ टिकवून ठेवतात. ज्यामुळे 'अर्बन हीट आयर्लंड' परिणाम होऊन उन्हाळ्यात रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर झळा जाणवत असून, मार्चमध्ये अनेक दिवस मुंबईचा पारा ३७ वर राहिला आहे. परिणामी दिवस आणि रात्र दोन्ही गरम अशी मुंबईची अवस्था आहे. शहरांमध्ये सिमेंट-काँक्रीट बांधकामांचा वाढता वापर ही चिंतेची बाब ठरत आहे.
या' कारणामुळे अनेकांची झोपमोड
पूर्वी डांबरी रस्त्यांचा वापर होत असताना, गेल्या काही वर्षांत टिकाऊपणा आणि कमी देखभालीच्या कारणास्तव सिमेंट काँक्रीट रस्त्यांना प्राधान्य दिले जात आहे. मात्र, डांबराच्या तुलनेत सिमेंट उष्णता अधिक शोषून घेतो आणि ती दीर्घकाळ टिकवून ठेवतो. यामुळे दिवसाची उष्णता रात्रीही कमी होत नाही आणि उशिरापर्यंत रस्त्यांवर झळा जाणवत असून, अनेकांची झोपमोड होत आहे.
झाडांची घटती संख्या
मुंबईमधील बदलत्या परिस्थितीमुळे 'अर्बन हीट आयर्लंड' परिणाम तीव्र होत आहे. शहरांमधील काँक्रीटची वाढती घनता, झाडांची घटती संख्या आणि उष्णता परावर्तित न होणे यामुळे शहरातील तापमान आसपासच्या ग्रामीण भागांच्या तुलनेत अधिक राहते. सिमेंट काँक्रीट रस्त्यांमुळे उष्णतेचा साठा वाढतो आणि पर्यावरणीय संतुलनावर परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होता. उष्णतेमुळे थकवा, डोकेदुखी, तसेच उष्माघातासारख्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते.
जागतिक तापमान वाढ, समुद्राचे तापमान वाढ तसेच शहरीकरण, प्रदूषण, वृक्षतोड, औद्योगीकरण, वाढती वाहने हे तापमान वाढण्याचे कारण आहे. जिथे उद्योग आहेत तिथे १० टक्के जास्त प्रदूषण वाढते. वायू उत्सर्जन हे प्रमुख तर वृक्षाचे कमी प्रमाण हेसुद्धा कारण आहे. रस्ते आणि घरांचे आणि बांधकामाचे काँक्रीटीकरण हे स्थानिक तापमानवाढीस कारणीभूत आहेत- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी