Join us

Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:01 IST

Tejasvee Ghosalkar And Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकर यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गट शिवसेनेला मोठे हादरे बसू लागले आहेत. काही दिवसांपू्र्वीच माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका आणि महिला दहिसर विधानसभाप्रमुख तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढण्यासाठी त्यांना 'मातोश्री'वर भेटीसाठी बोलाविलं होतं. तेजस्वी घोसाळकर यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 

"मी उद्धव ठाकरेंची  भेट घेतली. आज त्यांनी मला भेटायला बोलावलं होतं. आमच्यात चर्चा झाली आहे. माझ्या समस्या मी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. या समस्यांवर उत्तर मिळालं की मी पुढचा निर्णय लवकरात लवकर घेईन. भाजपात जाण्याबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. अजूनही मी ठाकरेंबरोबरच आहे. मी गद्दारी केलेली नाही"

"विभाग प्रमुख आणि विभाग संघटकांना मी समस्यांबाबत पत्र दिलं होतं. स्थानिक पातळीवर या समस्या सोडवल्या जातात. खालच्या स्तरावर काही गोष्टी क्लिअर होणं त्यावेळी गरजेचं होतं, पण त्या झाल्या नाहीत, त्यामुळे इथे यावं लागलं" असं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं आहे. 

तेजस्वी या माजी आमदार विनोद घोसळकर यांच्या सून असून, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. २०२४ मध्ये अभिषेक यांच्यावर मॉरीस नरोन्हाने फेसबुक लाइव्ह करत गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. २०१७ मध्ये काँग्रेसच्या तत्कालीन नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा पराभव करत, तेजस्वी पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. 

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेभाजपाराजकारण