मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 09:59 IST2025-11-04T09:58:27+5:302025-11-04T09:59:06+5:30
मेट्रोची सेवा तब्बल २० मिनिटांहून अधिक काळ विस्कळीत

मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सायंकाळी कार्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना अंधेरी दहिसर मेट्रोतील बिघाडाचा सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी फटका बसला. मेट्रो १ मार्गिकेच्या अंधेरी स्थानकात १ गाडी बिघडल्याने मेट्रोची सेवा तब्बल २० मिनिटांहून अधिक काळ विस्कळीत झाली. तसेच या गाडीतून प्रवाशांना उतरविण्याची वेळ मुंबई मेट्रो वनवर आली. परिणामी स्थानकांवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
मेट्रो १ मार्गिकेवर अंधेरी स्थानकात सायंकाळी ५.१० वाजण्याच्या सुमारास एका गाडीत तांत्रिक बिघाड झाला. गाडी सातत्याने बंद पडत असल्याने या गाडीतून अंधेरी स्थानकात प्रवाशांना उतरावे लागले. ऐन गर्दीच्या वेळी ही गाडी बंद पडली. त्यातून या संपूर्ण मार्गिकेवरील सेवा विस्कळीत झाली. कार्यालये सुटण्याच्या वेळेत स्थानकात येणाऱ्या प्रवाशांचीही संख्या मोठी होती. त्यातून स्थानकात आणि फलाटावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याने अखेर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेसह अन्य स्थानकांची प्रवेशद्वारे बंद करण्याची वेळ एमएमओपीएलवर आली. दरम्यान, प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने अखेर प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
कार्यालय सुटण्याच्या वेळी मेट्रो बंद पडल्याने हाल
एमएमओपीएलकडे विचारणा केली असता तांत्रिक बिघाडामुळे ५.१० वाजण्याच्या सुमारास एक गाडी बंद पडली. त्यातून २० मिनिटे सेवा विस्कळीत झाली. ५.३० वाजता सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. मात्र तांत्रिक बिघाडाचे कारण देण्यात आले नाही. ऐन कार्यालय सुटण्याच्या वेळी हा बिघाड आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.