Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो-५ आणि मेट्रो-९ साठी २४०.५५ कोटींचा तांत्रिक सल्लागार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 06:13 IST

स्पर्धात्मक निविदा असूनही प्रस्ताव मंजूर : अधिवेशनात मुद्दा गाजण्याची चिन्हे

नारायण जाधव 

ठाणे : एमएमआरडीएने आपल्या मेट्रो-५ च्या ठाणे ते भिवंडी आणि मेट्रो-९ अर्थात दहिसर ते मीरा-भार्इंदर आणि अंधेरी ते विमानतळ या मार्गांच्या स्थापत्य अंमलबजावणीसाठी मे. सिट्रो कर्न्सोटीएम यांना तब्बल २४० कोटी ५५ लाख ४२६ रुपये इतके अवाढव्य शुल्क देण्याची तयारी दर्शविली आहे. अंतिम निविदा सादर करण्याच्या २८ दिवस आधीचे ६ नोव्हेंबर २०१९ रोजीचे विनिमय दर लक्षात घेऊन तेदेण्यास एमएमआरडीएने आपल्या २६२ व्या बैठकीत मंजुरी दिली आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला हीच डेडलाइन दिली आहे.

मात्र, या कामासाठी स्पर्धात्मक वैश्विक निविदा मागवूनही इतक्या प्रचंड किमतीचा सल्लागार नेमण्याची तयारी एमएमआरडीएने ऐन विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याआधी दर्शविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे नव्या सरकारमध्ये या विषयावरून पहिल्याच अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला विरोधकांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पांची मूळ मंजुरी १० हजार १२ कोटी लाख इतकी असून मे. सिट्रो कर्न्सोटीएम यांना देण्यात येणारे शुल्क त्याच्या २.४० टक्के असल्याचा दावा एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्तांनी केला आहे. तसेच मे. सिट्रो कर्न्सोटीएम यांनी त्यांच्या स्पर्धात्मक निविदेतील दरापेक्षा आर्थिक देकारावर दीड टक्का सूट दिल्यानंतर ही रक्कम असल्याचे त्यांनी या बैठकीत जयंत बांठिया यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.या वैश्विक स्पर्धात्मक निविदांमध्ये देशविदेशातील सहा नामवंत कंत्राटदारांनी बोली लावली होती. त्यापैकी न्यूनतम असलेल्या पेडेको लिमिटेड यांच्याऐवजी मे. सिट्रो कर्न्सोटीएम यांची निविदा मंजूर करण्यामागे त्यांना मेट्रो कामांचा असलेला वैश्विक अनुभव हे कारण एमएमआरडीएने दिले आहे. यात मे. सिट्रो कर्न्सोटीएम यांना परदेशात दुबई, शांघाय, मनिला, अलजीअर्ससह देशात बंगळुरू, दिल्लीसह मुंबईतील मेट्रो-१ च्या कामांचा अनुभव असल्याचा दावा करून मेट्रो-२ व ४ ची संकल्पचित्र सल्लागार म्हणून हीच कंपनी काम करीत असल्याचे सांंगण्यात आले आहे. निविदा मंजूर करताना तांत्रिक निकषांस ७५ टक्के तर आर्थिक निकषांना २५ टक्के गुण देण्यात आले आहेत.

या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार स्पर्धात्मक वैश्विक निविदा असल्याने प्रकल्पाची मूळ किंमत पाहता मंजूर केलेले २.४० टक्के अर्थात २४० कोटी ५५ लाख ४२६ रुपये हे शुल्क खूपच जास्त आहे. तसेच प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्यांची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सल्लागार शुल्काची रक्कमही आणखी वाढण्याची शक्यता आहे.असे आहेत मार्गअंधेरी ते विमानतळ आणि मेट्रो-९ अंतर्गत दहीसर ते मीरा-भार्इंदर या दोन्ही मार्गांची एकूण लांबी १३.५८ किमी असून त्यासाठी सुमारे सहा हजार ६०७ कोटी रु पये खर्च अपेक्षित आहे. यातील मेट्रो मार्ग-९ हा एकूण १०.४१ किलोमीटर लांबीचा असून पूर्णत: उन्नत आहे. मीरा-भार्इंदर आणि मुंबई उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो-९ च्या विस्तारामुळे प्रवासाच्या कालावधीमध्ये ४० मिनिटांची बचत होणार आहे. हा प्रकल्प मार्च-२०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तर, ठाणे-भिवंडी मेट्रोमार्ग १५ किमीचा असून त्यामुळे प्रवासाच्या वेळेत ४० मिनिटांची बचत होणार आहे. 

टॅग्स :मेट्रोमुंबईरेल्वे