ऐन दिवाळीत शिक्षकांचे पगार रखडले, वेतन बिलामधील अडथळ्यामुळे फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:15 IST2025-10-16T12:15:17+5:302025-10-16T12:15:24+5:30
मुंबईतील शेकडो शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा पट अस्तित्वात असूनही, शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यतेशी तो जुळत नसल्याने शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाच्या शालार्थ प्रणालीमध्ये शून्य दिसत आहे.

ऐन दिवाळीत शिक्षकांचे पगार रखडले, वेतन बिलामधील अडथळ्यामुळे फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऐन दिवाळीत शिक्षकांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे दिवाळी साजरी करायची कशी, संसाराचा गाडा चालवायचा कसा, असा सवाल शिक्षकांकडून केला जात आहे.
मुंबईतील शेकडो शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा पट अस्तित्वात असूनही, शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यतेशी तो जुळत नसल्याने शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाच्या शालार्थ प्रणालीमध्ये शून्य दिसत आहे. परिणामी, संबंधित हजारो शिक्षकांची वेतन बिले तयार होत नाहीत. ऐन दिवाळीत पगार अडकले आहेत. मात्र, या तक्रारीवर उपाययोजना सुरू असल्याचे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे.
शालार्थ प्रणालीतून पगार तयार करण्याची प्रक्रिया संगणकीकृत असली, तरी ‘जनरेट पे बिल’ क्लिक करताच, शिक्षकांचा पट शून्य दिसतो. त्यामुळे पगार, भत्ते आणि इतर देयकांची निर्मिती थांबल्याचे शिक्षक हेमंत घोरपडे यांनी सांगितले. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही अडचण राज्यभरातील शिक्षकांची असून, ती दूर करण्याचे काम सुरू आहे.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची
संख्या शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या संचमान्यतेच्या संख्येशी जुळत नाही, अशा शिक्षकांची पे बिल अडकलेली आहेत. ऐन दिवाळीत ही समस्या निर्माण झाली आहे. या प्रणालीला विरोध नाही, परंतु, त्रुटी दूर कराव्यात.
- सुहास हिर्लेकर, महाराष्ट्र शिक्षक परिषद